पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमधील प्राध्यापकांच्या १११ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रक्रियेत सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी त्यात काही दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून. उमेदवारांना येत्या १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया काही दिवस लांबणीवर पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा >>> मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला २ फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ
विद्यापीठाने प्राध्यापक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू करून अर्जांसाठी ३० जानेवारीपर्यंतची मुदत दिली होती. मात्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून २५ जानेवारीला समांतर आरक्षणासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. समांतर आरक्षणामध्ये ३० टक्के महिला आरक्षण, ४ टक्के दिव्यांग, ५ टक्के खेळाडू आदी आरक्षणाबाबत स्पष्टता आहे. त्यानुसार भरती करताना सामाजिक आणि समांतर आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत सामाजिक आणि समांतर आरक्षणाची अंमलबजावणी करावी लागणार असल्याने काही बदल करावे लागणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उमेदवारांना १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे, तर अर्जाची प्रत २९ फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली. त्यामुळे भरती प्रक्रिया पुन्हा काही दिवस लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे.