लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना सभागृहाच्या बाहेर पावसात थांबवल्याचा प्रकार घडला. तसेच प्राध्यापक, निमंत्रित आणि पत्रकारांनाही कार्यक्रमाला आत जाण्यापासून रोखण्यात आले. या बाबत विचारणा केल्यावर विद्यापीठ प्रशासनाने आता न सोडण्याच्या सूचना दिल्याचे उत्तर देण्यात आले. प्रत्यक्षात अशा सूचना विद्यापीठ प्रशासनाने दिल्या नसतानाही पोलिसांकडून विद्यार्थी, प्राध्यापक, निमंत्रित, पत्रकारांची अडवणूक केल्याचे दिसून आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल रमेश बैस उपस्थित होते. विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपालांच्या उपस्थितीमुळे काटेकोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच पाऊस असल्याने विद्यापीठ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे अनेकांना सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला. सभागृहाबाहेर उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी विद्यार्थी, प्राध्यापक, निमंत्रित, पत्रकार आणि छायाचित्रकारांना आता जाण्यास मज्जाव केला. या बाबत काहींनी विचारणा केल्यावर विद्यापीठाच्या सूचनेप्रमाणे कोणालाही आत सोडता येणार नाही, आता बसायला जागा नाही, अशी उत्तरे देण्यात आली. मात्र, सभागृहात बसायला पुरेशी जागा असूनही सर्वानाच पावसात थांबावे लागले.

आणखी वाचा-सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ नागरिकाची ८९ लाखांची फसवणूक

कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी सोडण्याची पत्रकारांनी विनंती केल्यावर पोलिसांकडून अर्वाच्च भाषा वापरण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्याला बाहेर बोलवल्यानंतर पत्रकार आणि छायाचित्रकारांना आता सोडले. मात्र, सभागृहाबाहेर गर्दी वाढल्याने आणि परिस्थितीची जाणीव झाल्यानंतर काहींना सभागृहात सोडण्यात आले. कार्यक्रम झाल्यानंतर याबाबत चतु:श्रुंगी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असताना त्यांनी या विषयावर बोलायचे टाळले.

मंचावर मानापमान नाट्य

पदवी प्रदान कार्यक्रमासाठी पूर्वनियोजित बैठक व्यवस्थेनुसार अग्रभागी सात खुर्च्यांचे नियोजन होते. परंतु अचानक त्या रांगेतून २ खुर्च्या मागे ठेवण्यात आल्या. त्यामुळे परीक्षा नियंत्रक आणि वित्तलेखा अधिकाऱ्यांना मागच्या रांगेत बसावे लागले. या बदलावरून नाराजीनाट्यही होऊन काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

Story img Loader