लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चंदेरी उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाचे बोधचिन्ह असलेले ७५ ग्रॅमचे चांदीचे नाणे वाटण्यात येत असून, त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून विद्यापीठाची आर्थिक स्थिती अडचणीची झाल्याचे सांगितले जात असताना चांदीच्या नाण्यांवर खर्च करण्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

विद्यापीठाचे २०२३-२४ हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष होते. या वर्षभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, अमृत महोत्सवी वर्ष कोरडे गेल्यानंतर बहुतांश नियोजित कार्यक्रम आता ७६व्या वर्षात करण्यात येत आहेत. चांदीच्या नाण्यांचे वाटप हा त्यातीलच एक कार्यक्रम आहे. अमृत महोत्सवी वर्ष सुरू झाल्यावर चांदीचे नाणे देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर बॅग देण्याचा प्रस्तावही देण्यात आला होता. चांदीचे नाणे की बॅग, यावर बराच काळ चर्चा होऊन अखेरीस नाणे देण्यात येत आहे. विद्यापीठातील सुमारे एक हजारांहून अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना चांदीचे नाणे देण्यात येत असल्याचे विद्यापीठातील सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा-नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?

विद्यापीठातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोन्याचे नाणे देण्याची पद्धत बऱ्याच वर्षांपासून आहे. आजवर या नाण्यांवर बराच खर्च करण्यात आला आहे. या मुद्द्यावरूनही अधिसभेत वाद झाला होता. त्यानंतर आता चांदीचे नाणे देण्यात येत आहे. एकीकडे आर्थिक अंदाजपत्रकात तूट दाखवली जात असताना दुसरीकडे चांदीचे नाणे देण्यात येत असल्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सुवर्ण आणि हीरक महोत्सवानिमित्त विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून सन्मानचिन्ह देण्यात आले होते. त्याच प्रचलित पद्धतीनुसार विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कर्मचाऱ्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे, असे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-शहरातील ‘या’ मतदारसंघात होणार ‘घड्याळ’ विरुद्ध ‘तुतारी’ लढत!

विद्यार्थ्यांच्या समस्यांचे काय?

विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. कमवा व शिका योजनेचे स्वरूप अतिशय मर्यादित करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती फारशी रक्कम पडत नाही. विद्यापीठाचा अर्थसंकल्प तुटीचा असतो. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवल्या जात नसताना विद्यापीठाकडून चांदीचे नाणे वाटणे योग्य नाही, असे विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या राहुल ससाणे यांनी सांगितले.