पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेच्या संभाव्य अभ्यासक्रमात अर्थशास्त्र विषय मुख्य विषय ठेवण्याऐवजी दुय्यम ठेवण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे अर्थशास्त्र विषय न शिकताच विद्यार्थ्यांना वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र शाखेची पदवी देणे योग्य नसल्याचे सांगत व्यावसायिक अर्थशास्त्र आणि बँकिंग, फायनान्स आणि इन्श्युरन्स हे विषय मुख्य विषय म्हणून समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे. अर्थशास्त्र विषयाच्या शिक्षकांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन दिले. डॉ. अजय दरेकर, डॉ. मेघना भोसले, डॉ. विलास आढाव डॉ. लहानू रेटवडे, डॉ. परमेश्वर गडकर, डॉ. दत्ता घोडके, सूर्यकांत गायकवाड, डॉ. मनोहर सानप आदी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… ‘मावळ’वरील भाजप, अजित पवार गटाच्या दाव्यावर खासदार बारणे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’…

हेही वाचा… चाळीस कोटींपेक्षा जास्त किंमत असूनही घरांना मागणी! जाणून घ्या खरेदी करणारे कोण…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या धोरणाची अंमलबजावणी करणारे अग्रगण्य विद्यापीठ आहे. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग अभ्यास मंडळाने संभाव्य अभ्यासक्रमात व्यावसायिक अर्थशास्त्र हा मुख्य (मेजर) विषय ठेवण्याएवजी दुय्यम (मायनर) ठेवण्याचे प्रस्तावित केले आहे. मात्र, हा अभ्यासक्रम जसाच्या तसा लागू झाल्यास विद्यार्थी व्यावसायिक अर्थशास्त्र व बँकिंग यांसारख्या मूलभूत अभ्यासापासून वंचित राहतील. परिणामी वाणिज्य विद्याशाखेतून तयार होणारा विद्यार्थी परिपक्व होणार नाही. अर्थशास्त्र हा विषय वाणिज्य शाखेसाठी मुख्य विषय ठेवल्याने कोणत्याही विषयाच्या कार्यभारावर परिणाम होणार नाही. मात्र, प्रस्तावित अभ्यासक्रम जसाच्या तसा स्वीकारल्यास अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक कमी होण्याचा धोका आहे. तसेच प्रस्तावित अभ्यासक्रम शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university is giving less preference to economics pune print news ccp 14 asj