लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता परदेशी विद्यापीठांना देशात येण्यासाठी मुभा देण्यात आली असताना आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशाबाहेर विस्तार करत आहे. कतार येथे सुरू केलेले शैक्षणिक केंद्रानंतर आता आणखी चार देशांमध्ये विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली आहे.
देशात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांपैकी पुण्यात येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यातही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला विद्यार्थ्यांची पसंती असते. त्यात आफ्रिकेतील देश, आखाती देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून तीन वर्षांपूर्वी विद्यापीठाचे शैक्षणिक केंद्र कतार येथे सुरू करण्यात आले. या केंद्राद्वारे विविध अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे. सुमारे पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी या केंद्राच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर आता जॉर्जिया, दुबई, सौदी, कझाकिस्तान येथेही उपकेंद्र सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा-पुणेकरांना तुमच्या मिठाईत भेसळ आहे? तपासणारी यंत्रणाच नाही कारण निवडणूक; जाणून घ्या नेमका प्रकार
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत जॉर्जिया, दुबई, सौदी, कझाकिस्तान येथे विद्यापीठाचे शैक्षणिक केंद्र सुरू करण्यासाठीच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. या देशांतून विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यामुळे या ठिकाणी विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली आहे. आता पुढील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उपकेंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदीनुसार शिक्षणाचे आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्न आहे. जॉर्जिया, दुबई, सौदी, कझाकिस्तान येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव संबंधित देशांतून सादर करण्यात आला. त्यानुसार व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा करून केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली. स्थानिक व्यवस्थापनाच्या सहकार्याने विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्यात येईल. त्यानुसार इरादापत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.