पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्र गुरुकुल विभागातर्फे ‘संशोधक उवाच’ हा अनोखा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत ललित कला केंद्रात पीएच.डी. करणारे विद्यार्थी त्यांचे संशोधन, निरीक्षणांचे सादरीकरण करणार असून, संशोधनाविषयी इतरांशी संवादातून मार्गदर्शनही घेता येणार आहे.
ललिक कला केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी ही माहिती दिली. ललित कला केंद्रात संगीत, नृत्य, नाटक या प्रयोगकलांचे पदवी, पदव्युत्तर तसेच संशोधन अभ्यासक्रम राबविले जातात. ललित कला केंद्र गुरुकुल विभागात सध्या एकूण आठ विद्यार्थी विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवी करीता संशोधन करत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन, संशोधनाची तयारी सादर करता येण्यासाठी संशोधक उवाच हा उपक्रम शुक्रवारपासून (२५ ऑगस्ट) सुरू करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सायंकाळी पाच वाजता ललित कला केंद्रातील साधना सभागृहात श्रीपाद शिरवळकर खान्देशातील लोकसंगीत या विषयावर विवेचन करणार आहेत. लोकसंगीताचे अभ्यासक संजय करंदीकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मुक्त प्रवेश आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये संशोधन सुरू असते. त्यात पीएच.डी. करणाऱ्या संशोधकांचे संशोधन स्वतंत्रपणे सुरू असते. त्यांचा संबंध फारतर त्यांच्या मार्गदर्शकाशी येतो. मात्र, संशोधन स्वतःपुरते राहू नये, त्याची देवाणघेवाण व्हावी, काय संशोधन चालले आहे, याची माहिती व्हावी, या उद्देशाने संशोधक उवाच हा उपक्रम सुरू केला आहे. पीएच.डी. मध्ये शेवटच्या टप्प्यावर मुलाखत होते, त्याऐवजी संशोधनाच्या मधल्या टप्प्यांवर संवाद झाल्यास संशोधन अधिक चांगले होण्यास मदत होईल, असे डॉ. भोळे यांनी सांगितले.
हेही वाचा – वाहनचालकांवरील थकीत दंड होणार कमी, पोलीस करणार ‘अशी’ तडजोड
अन्य विभागांचाही सहभाग
येत्या काळात अन्य विभागांतील विद्यार्थ्यांनाही त्यांचे संशोधन सादर करण्यासाठी सहभागी करून घेण्याचा विचार आहे. जेणेकरून संशोधनाची माहिती होण्यासह विचारांची देवाणघेवाण होऊन आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना मिळू शकेल, असेही डॉ. भोळे यांनी सांगितले.