पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाइन अर्ज भरून घरबसल्या मिळणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाकडून खास संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचा त्यांच्या अर्जाचा प्रवास तपासता येणार असून, प्रत्येक टप्प्याची माहिती लघुसंदेश आणि ई मेलद्वारे मिळणार आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्या हस्ते संकेतस्थळाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. अधिसभा सदस्य राहुल पाखरे, विद्यावाणीचे माजी संचालक आनंद देशमुख, पदवी प्रमाणपत्र विभागाचे उपकुलसचिव ज्ञानेश्वर साळुंके, बाळासाहेब आंत्रे, विक्रम संगर, तुषार बेलेकर या वेळी उपस्थित होते. या प्रणालीसंदर्भात गेल्यावर्षी विद्यापीठाच्या अधिसभेत या बाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा…पुणे-मुंबई रेल्वे प्रवास विस्कळीत; मुसळधार पावसामुळे अनेक गाड्या रद्द, प्रवाशांचे हाल
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या विद्यापीठातील प्रवेशासाठी, पारपत्र, व्हिसासाठी अर्ज करताना ट्रान्सक्रिप्ट प्रमाणपत्रासह इतर प्रमाणपत्रे अनिवार्य असतात. आतापर्यंत ही कागदपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, त्याची मुद्रित प्रत आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्राकडे (स्टुडंट फॅसिलिटेशन सेंटर) सादर करावी लागत होती. या प्रक्रियेत बराच वेळ जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. मात्र आता ही संपूर्ण प्रक्रिया संकेतस्थळाद्वारे होणार असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह विद्यापीठाच्या संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा विभागाकडून त्या संदर्भातील कार्यवाही पूर्ण केली जाईल आणि विद्यार्थ्यांना घरबसल्या ही प्रमाणपत्रे मिळणार आहेत. त्यासाठीचे https://sim.unipune.ac.in/sim_app/Login/Login संकेतस्थळाची निर्मिती विद्यापीठाच्या एज्युटेक फाउंडेशनने केली आहे.