पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची आगामी बैठक एका खासगी शिक्षण संस्थेत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नगर आणि नाशिक येथे असलेल्या उपकेंद्रांना डावलून विद्यापीठासारख्या शासकीय संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक खासगी संस्थेत आयोजित करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील सदस्यांचा समावेश आहे. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रशासकीय आणि धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेतले जातात. आतापर्यंत अनेकदा मागणी करूनही व्यवस्थापन परिषदेचे निर्णय विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जात नाहीत.

असे असताना, व्यवस्थापन परिषदेतील एका सदस्याच्या नामांकित शिक्षण संस्थेचे कामकाज पाहण्याचे कारण काढून व्यवस्थापन परिषदेचा दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्याबरोबरच व्यवस्थापन परिषदेची बैठक त्याच संस्थेत घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. मात्र, विद्यापीठाचे शासकीय कामकाज खासगी शिक्षण संस्थेत करण्याचे कारण काय, विद्यापीठाची उपकेंद्रे असताना खासगी शिक्षण संस्थेला प्राधान्य कशासाठी, असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेची बैठक खासगी संस्थेपेक्षा उपकेंद्रात घेणे गरजेचे आहे. कुलगुरू व्यवस्थापन परिषदेची बैठक खासगी संस्थेत घेत असल्यास कुलगुरू आणि व्यवस्थापन परिषद खासगी संस्थाचालकांच्या किती प्रभावाखाली आहे हे दिसून येते, असे विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य डॉ. हर्ष गायकवाड यांनी सांगितले. विद्यापीठाकडे स्वत: सर्व प्रकारची साधन सुविधा उपलब्ध आहे. मात्र, खासगी संस्थेत व्यवस्थापन परिषदेत आयोजित करण्यामागील हेतू कळत नाही, तसेच असे करण्याची आवश्यकताही नाही, अशी भूमिका माजी अधिसभा सदस्य प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी मांडली.