पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता मंदिर व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. सहा महिने मुदतीच्या या अभ्यासक्रमातून व्यावसायिक पद्धतीने मंदिर व्यवस्थापनासाठीची कौशल्ये, मंदिर व्यवस्थापनाचे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलू या विषयीचे मार्गदर्शन करण्यात येणार असून, फेब्रुवारीपासून विद्यापीठाच्या नाशिक संकुलात, तर पुणे येथे जूनपासून अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत.

मंदिर व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने टेम्पल कनेक्ट या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. करारावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, टेम्पल कनेक्टरचे संस्थापक गिरेश कुलकर्णी, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे या वेळी उपस्थित होते. या पूर्वी अशा प्रकारचे करार मुंबई विद्यापीठ आणि वेलिंगकर संस्था यांच्याशी करण्यात आले आहेत. या दोन्ही संस्थांतील अभ्यासक्रम सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत.

हेही वाचा – पुणे : रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरणारी टोळी गजाआड, साडेदहा लाखांच्या तांब्याच्या तारा जप्त

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत नाशिक संकुलात अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सक्षम मंदिर व्यवस्थापकांची नवी पिढी घडणार आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाद्वारे महत्त्वपूर्ण परिणाम घडण्याची अपेक्षा आहे. अभ्यासक्रमासाठी राज्यातूनच नाही, तर देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येऊ शकतात, असे डॉ. गोसावी यांनी सांगितले.

हेही वाचा – टोरेस गैरव्यवहार प्रकरणः मुंबई व जयपूर येथील १३ ठिकाणी ईडीचे छापे

मंदिर व्यवस्थापन पदविका हे मंदिर व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील पुढील पाऊल आहे. मंदिर परिसंस्थेमध्ये नावीन्यपूर्ण आणि शाश्वत बदलांसाठी विद्यार्थी घडवण्याचे उद्दिष्ट आहे. येत्या काळात सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम, एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम आणि दोन वर्षांचा मंदिर व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (एमबीए) सुरू करण्याचे नियोजन आहे, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

Story img Loader