पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे देण्यात येणाऱ्या ‘पोस्ट डॉक फेलोशिप’ची रखडपट्टी झाली आहे. सप्टेंबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू केल्यानंतर फेब्रुवारीमध्येही फेलोशिपधारकांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत.

सर्वसाधारणपणे पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी पुढील संशोधनासाठी परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतात. ही बाब लक्षात घेऊन पीएच.डी.नंतरच्या संशोधनाला चालना देण्यासाठी डॉ. नितीन करमळकर यांनी त्यांच्या कुलगुरू पदाच्या काळात पुढाकार घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोस्ट डॉक फेलोशिप सुरू करण्याचा निर्णय घेतला. पोस्ट डॉक फेलोशिप सुरू करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहुधा राज्यातील एकमेव विद्यापीठ आहे. त्यानुसार २०१९मध्ये पहिल्यांदा फेलोशिपची प्रक्रिया राबवून पात्र उमेदवारांची निवड करण्यात आली. फेलोशिप सुरू केल्यानंतर दर वर्षी प्रक्रिया राबवणे आवश्यक होते. मात्र, २०२०मध्ये करोना प्रादुर्भाव सुरू झाल्याने चार वर्षे ही फेलोशिप प्रक्रिया राबवण्यातच आली नाही. यंदा सप्टेंबरमध्ये पुन्हा फेलोशिपची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

‘सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी – पोस्ट डॉक्टरल फेलोशिप’ विज्ञान, तंत्रज्ञान, वाणिज्य, मानव्यविज्ञान, भाषा अशा विद्याशाखांसाठी दिली जाते. त्यात पीएच.डी. प्राप्त असलेल्या एकूण वीस उमेदवारांची निवड करण्यात येते. यंदा या फेलोशिपसाठी ७९ उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, सप्टेंबरमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू केल्यानंतर विद्यापीठाकडून पुढील प्रक्रियाच राबवण्यात आलेली नाही. त्यामुळे अर्ज केलेले उमेदवार फेलोशिपच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच विद्यापीठाने फेलोशिपची प्रक्रिया का राबवली नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, ‘पोस्ट डॉक्टरल फेलोशिप’ची उर्वरित प्रक्रिया येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येईल. तसेच पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले.

Story img Loader