पुणे : बरीच वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर अखेरीस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या रिक्त जागांवर आता भरती प्रक्रिया होणार आहे. विद्यापीठातील रिक्त जागांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार असून, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया रविवार (१ जानेवारी) ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात विद्यापीठातील शैक्षणिक विभागांना पूर्णवेळ प्राध्यापक मिळणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रिक्त असलेल्या २१५ पैकी १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ही पदे भरण्यासाठी आवश्यक असणारी जाहिरात पुणे विद्यापीठाकडून शनिवारी प्रकाशित करण्यात आली आहे. प्राध्यापकांच्या जागांसह विद्यापीठाच्या प्रशासनामध्येही काही पदे भरण्यात येणार आहे. त्याबाबतची कार्यवाही करण्यात आली असून, त्या पदांच्या जाहिरातीही लवकरच प्रसिद्ध केल्या जातील, असे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>“आमच्या पाडा पाडीत पडाल, तर…”, कोल्हेंना दिलेल्या ‘त्या’ आव्हानावरून राऊतांचा अजित पवारांना इशारा

 विद्यापीठात बऱ्याच काळात प्राध्यापक भरती न झाल्याने, विविध शैक्षणिक विभागांमध्ये निम्म्यापेक्षा अधिक प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. काही विभागांमध्ये तर, केवळ एक किंवा दोन पूर्णवेळ प्राध्यापक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळे  विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता खालावण्यासह  विद्यापीठाच्या क्रमावरीवरही परिणाम झाला आहे. मंजूर पदांपैकी रिक्त जागांवर भरती होत नसल्याने विद्यापीठाला  कंत्राटी तत्वावर १३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवावी लागत आहे. मात्र आता १११ पदांची भरती होणार असल्याने विद्यापीठाला दिलासा मिळणार आहे.

विद्यापीठातील रिक्त जागांसाठी उमेदवारांना ३१ जानेवारीपर्यत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, असे सांगण्यात आले आहे. अधिक माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule pune university recruitment for 111 vacancies pune print news ccp 14 amy