पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील २१५ रिक्त पदांपैकी १११ जागांवर पूर्णवेळ प्राध्यापकांची भरती होणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांतील रिक्त जागांचा प्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरती न झाल्याने विविध शैक्षणिक विभागातील जवळपास निम्म्यापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. काही विभागांमध्ये एकच प्राध्यापक, प्राध्यापकांवर अतिरिक्त कार्यभाराचा ताण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राध्यापक नसल्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर, तसेच विद्यापीठाच्या क्रमवारीवरही होतो. त्यामुळे तात्पुरती मलमपट्टी म्हणून विद्यापीठाकडून कंत्राटी पद्धतीने प्राध्यापक भरती केली जाते. त्यानुसार नुकतीच १३३ प्राध्यापकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
हेही वाचा >>> पुणे : राष्ट्रीय स्मारकासाठी भिडेवाडा इतिहासजमा! – पोलीस बंदोबस्तात रात्री महापालिकेकडून कार्यवाही
राज्यातील विद्यापीठांतील रिक्त जागांच्या भरतीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाला १११ रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार या पदांच्या भरतीची प्रक्रिया विद्यापीठाकडून सुरू करण्यात आली. बिंदुनामावलीसारखी तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर विद्यापीठाला पूर्णवेळ प्राध्यापक उपलब्ध होऊ शकणार आहेत. विद्यापीठ आता नॅक मूल्यांकन प्रक्रियेला सामोरे जाणार आहे. नॅक मूल्यांकनामध्ये प्राध्यापकांची संख्या, विद्यार्थी शिक्षक गुणोत्तर हे घटक महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे नॅक मूल्यांकनापूर्वी पूर्णवेळ प्राध्यापक भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या १११ जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ