लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही महिन्यांपासून घडलेल्या गैरप्रकार, घटनांची दखल घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘विशेष सुरक्षा हेल्पलाइन’ सुरू केली आहे. चोवीस ता सुरू राहणाऱ्या हेल्पलाइनद्वारे विद्यापीठ परिसरातील सुरक्षेसंबंधित तक्रारी आणि आपत्कालीन परिस्थितीवर तत्काळ उपाययोजना केली जाणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

विद्यापीठामध्ये मुलांच्या वसतिगृहात अमली पदार्थ सापडण्याच्या दोन घटना उघडकीस आल्या, तर मुलींच्या वसतिगृहात मद्याच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे सापडण्यासह त्रास दिल्याची तक्रार एका विद्यार्थिनीने केली होती. तसेच, २५ मार्च रोजी विद्यापीठाच्या आवारात एका व्यक्तीने काही विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील कृत्य केल्याची तक्रार काही विद्यार्थिनींनी केली.

तसेच संबंधितावर कारवाईची मागणी करत आंदोलन करण्यात आले. या प्रकारांनी विद्यापीठाच्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या अनुषंगाने विद्यापीठाने सुरक्षेच्या दृष्टीने चोवीस तास सुरू असणारी हेल्पलाइन सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार ०२०-४८५५३३८३ हा विद्यापीठाचा सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सुरक्षासंबंधी तक्रारी, आपत्कालीन परिस्थिती, कोणतीही घटना तत्काळ आणि विश्वासार्ह पद्धतीने नोंदवणे, समस्येचे तातडीने निराकरण करण्याचा या हेल्पलाइनचा उद्देश असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. संशयास्पद हालचाली नोंदवणे, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत मिळवणे, सुरक्षिततेशी संबंधित तक्रारी, छळ किंवा त्रासदायक परिस्थितीत मदत मिळवण्यासाठी ही हेल्पलाइन वापरता येणार आहे. हेल्पलाइन क्रमांक विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांनी आपल्याकडे नोंदवून ठेवावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

‘सुरक्षेसंदर्भातील समस्यांबाबत हेल्पलाइनवर संपर्क साधावा. प्रशिक्षित सुरक्षा कर्मचारी परिस्थितीनुसार आवश्यक ती कार्यवाही करतील. विद्यापीठाची सुरक्षा यंत्रणा आवश्यकतेनुसार स्थानिक कायदा-सुव्यवस्थेबाबत समन्वय साधेल, अत्यंत गुप्तता राखून आणि तातडीने प्रकरणे हाताळली जातील,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.

आतापर्यंत विद्यार्थ्यांकडे विद्यापीठाचा सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक नव्हता. आता विद्यापीठाने सुरक्षा क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या सुविधेमुळे किमान तातडीने सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. हेल्पलाइनमुळे काही प्रमाणात सुरक्षितता मिळू शकेल.-तुकाराम शिंदे, विद्यार्थी