लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृतमहोत्सवी वर्ष सुरू आहे. जूनपर्यंत विद्यापीठात ‘प्रभारीराज’ असल्याने काही कार्यक्रम झाले नाहीत. त्यामुळे अमृतमहोत्सवी वर्षातील कार्यक्रमांच्या आयोजनासाठीची विशेष समिती नियुक्त करण्याव्यतिरिक्त विद्यापीठाने गेल्या पाच महिन्यांत एकही कार्यक्रम आयोजित केलेला नाही

तत्कालीन पुणे विद्यापीठाची स्थापना १० फेब्रुवारी १९४९ रोजी झाली. त्यामुळे यंदा १० फेब्रुवारीला विद्यापीठाचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू झाले. राज्यात आघाडीचे विद्यापीठ म्हणून ओळख मिळवलेल्या विद्यापीठाच्या वाटचालीत अमृतमहोत्सवी वर्ष हा महत्त्वाचा टप्पा असल्याने वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिसभेत करण्यात आली होती. त्यासाठी अर्थसंकल्पात १० लाख रुपये निधीची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर अमृतमहोत्सवी वर्षात कार्यक्रमांच्या आयोजनासाठी एप्रिलमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन समिती सदस्यांचा समावेश असलेली विशेष समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडून कार्यक्रम निश्चित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

हेही वाचा… गडकिल्ले, संरक्षित स्मारक संवर्धनासाठी मिळणार भरपूर निधी

गेले वर्षभर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू नव्हते. वर्षभराहून अधिक काळ डॉ. कारभारी काळे यांच्याकडे विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार होता. डॉ. सुरेश गोसावी यांची जूनच्या पहिल्या आठवड्यात कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांचा बराच वेळ विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा, जी-२० परिषदेअंतर्गत झालेल्या बैठका, कार्यक्रमांमध्ये गेला. विद्यापीठाकडून अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नुकतीच बोधचिन्ह स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेचा अपवाद वगळता आतापर्यंत विद्यापीठाने अमृतमहोत्सवी वर्षात एकही विशेष कार्यक्रम आयोजित केलेला नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येत्या काळात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्यात शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचा समावेश असेल. कार्यक्रमांची रुपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Savitribai phule university has not organized a single program in the amrutmahotsav year in pune print news ccp 14 dvr
Show comments