लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुमारे शंभर महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाबाबत कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्यामुळे नॅक प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महाविद्यालयांना कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
उच्च शिक्षण संस्थांना नॅक मूल्यांकन करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक महाविद्यालयांनी त्याकडे दुर्लक्षच केले आहे. उच्च शिक्षण विभागाकडून वारंवार सूचना देऊनही फारसा परिणाम झालेला नाही. त्यामुळे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांची संलग्नता रद्द करण्याचे आदेश विद्यापीठांना देण्यात आले आहेत. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही कुलगुरूंची बैठक घेऊन नॅक मूल्यांकन प्रक्रिया न केलेल्या महाविद्यालयांची यादी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यात नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन न केलेल्या महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिस बजावण्याची सूचना केली होती.
आणखी वाचा-पिंपरी- चिंचवडमधील मालमत्तांना मिळणार ‘युपीक आयडी’
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील जवळपास शंभर महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, की विद्यापीठाच्या प्रणालीत नॅक मूल्यांकनाची माहिती महाविद्यालयांना भरावी लागले. मात्र ४० ते ४२ महाविद्यालयांनी एकदाही नॅक मूल्यांकन केलेले नाही, तर ५० हून अधिक महाविद्यालयांनी पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांना कारणे नोटिस बजावण्यात आली आहे. महाविद्यालयांनी त्यांचा खुलासा सादर केल्यावर छाननी करून शासनाच्या निर्देशानुसार नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसलेल्या महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच महाविद्यालयांवरील कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल.