शहनाईचे मंगल सूर, सतारीचा झळाळता स्वरझंकार, मनास भुरळ घालणारा तबल्याचा ठेका आणि दिग्गजांच्या गायकीचा खळाळता आविष्कार अशा वातावरणात गुरूवारी (१२ डिसेंबर) सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला सुरूवात होणार आहे.
गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता मधुकर धुमाळ यांच्या शहनाई वादनाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. धुमाळ यांच्यानंतर रेवा नातू यांच्या गायनाने मैफल रंगणार आहे. जागतिक कीर्तिचे सतारवादक उस्ताद निशात खाँ यांचे सतारवादन आणि अनिंदो चटर्जी यांचे तबलाबादन हेदेखील या दिवसाचे आकर्षण ठरेल. यानंतर संजीव अभ्यंकर, डॉ. अश्विनी भिडे देशपांडे यांच्या गायनाचा आनंद घेण्याची संधी रसिकांना मिळेल. या दिवसाच्या शेवटच्या सत्रात पं. जसराज आपल्या गायकीने मैफलीवर कळस चढवतील.
उस्ताद निशात खाँ यांच्याशी संवाद
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचाच एक भाग म्हणून गुरूवारी सादर होणाऱ्या ‘षडज् आणि अंतरंग’ या कार्यक्रमात उस्ताद निशात खाँ यांच्याशी प्रकट संवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. गणेशखिंड रस्त्यावर राहुल चित्रपटगृहाजवळील सवाई गंधर्व स्मारकात सकाळी साडेदहा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात निशात खाँ यांच्याशी मंगेश वाघमारे संवाद साधणार आहेत. याच वेळी पं. जसराज यांच्या कलाजीवनावरील चित्रपटही दाखवण्यात येईल. षडज् आणि अंतरंग हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा