श्रावण महिन्यात सुरू होणाऱया सणासुदीला दिवाळीनंतर विराम मिळतो आणि मग एका मोठ्या पोकळीची जाणीव होऊ लागते. चैत्र महिन्यापर्यंत आता काही नाही, या जाणिवेने सणांच्या वातावरणाने उल्हासित झालेले मन खट्टू होते. पण तेवढ्यात मनात झंकार उमटतो, अरे डिसेंबरमध्ये सवाई आहे ना! आणि मग दिवाळीनंतर सवाईच्या प्रतिक्षेत मन रमून जाते. दैनंदिन रहाटगाडग्याला उत्साहाने सामोरे जाण्याचे कारण मिळते.
सवाई आता नुसता संगीत महोत्सव राहिला नसून, एक सर्वसमावेशक कलामहोत्सव झाला आहे. रमणबाग मैदानावर काल पुन्हा याची प्रचिती आली. छायाचित्रीकरण, धातूमुद्रानिर्मिती या कलांचे प्रदर्शन रसिकांना अनुभवता येणार आहे. या प्रदर्शनातून चक्कर मारली. अब्दुल करीम खॉं, सवाई गंधर्व, भीमसेनजी यांच्या अनोख्या धातूमुद्रा तसेच पंडित रविशंकर यांची दुर्मिळ छायाचित्रे बघता आली. रागाच्या भावनिर्मितीवर आधारित अत्तरांची निर्मिती या संकल्पनेचे कौतुक वाटले. एक कलाकार महिला विविध कलाकारांच्या चित्रांच्या लॅंपशेड्स अतिशय कुशलतेने बनवून देत होत्या. हे सगळे कलाविष्कार एकाच ठिकाणी अनुभवताना टागोरांच्या शांतीनिकेतनाची आठवण झाली नाही तर नवलच. गाण्याचा आनंद खाण्याबरोबर द्विगुणित करण्याकरता अनेक स्टॉल्स झटत होते. सडेतोड पुणेकर, हिशेबी पुणेकर, चक्रम पुणेकर अशा पदव्यांनी विभूषित पुणेकरांच्या शिरपेचात खवय्ये पुणेकर हे मोरपीस कधीच खोवले गेले आहे. संगीतातले हौशे-नवशे, पंडित उस्ताद, समीक्षक, परीक्षक प्राण कानात आणून ऐकणारे तर काही नुसतेच भिरभिरणारे, काही जन्मभर संगीत उपासनेत जन्म घालवणारे तर काही मोठ्या कलाकारांशी असलेल्या सलगीलाच आणि त्यांच्या किस्स्यांमध्ये जन्म घालवणारे अशा सर्वांच्या स्नेहभेटीचे वार्षिक संकेतस्थळ म्हणजे सवाई.
काम आटपून कार्यक्रमस्थळी पाच वाजता पोहोचलो. तोपर्यंत मुधकर धुमाळ यांचे सनईवादन झाले होते. रेवा नातूंचे सौभाग्यदालक्ष्मी भजन ऐकता आले. भीमसेनजींनी अजरामर करून ठेवलेले हे भजन ऐकताना तरतरी आली.
पावणेसहा वाजता डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे आणि संजीव अभ्यंकर यांची जसरंगी जुगलबंदी सुरू झाली. अश्विनी भिडेंच्या सप्तकातील मध्यमाला संजीव यांनी षड्ज मानून गायचे या ‘मूर्छना’ तत्त्वावर आधारित आणि पंडित जसराजनिर्मित ही जुगलबंदी. डॉ. भिडेंच्या अभोगीला संजीवजींचे पूरक कलावती. गाणं सुरू झालं आणि काही क्षणांत माहोल तयार झाला. ऐकमेकांच्या शेजारी बसून दोन वेगवेगळे राग गायचे आणि तेसुद्धा दुसऱयाच्या गाण्यात न गुंतता विलक्षण ताकद आणि तयारी लागते याला. दोन्ही कलाकार प्रगल्भ कला आनंदात आकंठ बुडालेले, कोणत्याही गोष्टीचा बागुलबुवा न करता फक्त अतुलनीय स्वरविलास चिजेशी लडीवाळ सलगी करण्यात स्वर्गीय आनंद घेणारे आणि देणारे. स्त्रीच्या स्वरयंत्रातील टिपेचा गुण आणि पुरुषाच्या आवाजातील भारदस्तपणा यांचा अपूर्व मिलाप कार्यक्रमभर रोमहर्षक होत होता. रुपकच्या समेवर दोघांचे असे अवतरणे की दोन भिन्न स्वभावाचे पण प्रिय मित्र अनेक वर्षांनी भेटतात तेव्हा पहिली भेट चक्षू मिलनानी होते तो अलवार, उत्कट क्षण. मध्यलयीतला रुपकाचा ठेका असला की तबलजींचीसुद्धा ब्रह्मानंदी टाळी लागते. त्याला दुसऱया मात्रांचा विचार पण येत नाही. त्याला वाटतं तास न् तास हाच ठेका धरावा आणि गायकाला वाटत या ठेक्यातच बंदीश पेरत ठेवावी. शास्त्रीय संगीत का ऐकावं, याचं उत्तर या अविष्कारात होतं. चित्तवृत्ती शांत होणं, प्रसन्न होणं, शरणभाव जागृत होणं सर्व काही. तानांचे वैविध्य वैशिष्ट्यपूर्ण पण मूळ भावाला कुठेही छेद जाईल, असा आक्रस्ताळेपणा नाही. दोन्ही गायकांनी एकमेकांचा आब राखून दाखवलेला संयम वाखाणण्याजोगा. दुसऱया सादरीकरणात दुर्गा आणि भूपचे असेच अजोड सादरीकरण. रुपक सारखाच डौलदार अध्ध्याचा ठेका. रोहित मुजुमदार आणि अजिंक्य जोशींची संयत साथ. तन्मय देवचके आणि मिलिंद कुलकर्णीचे पेटीतून समर्थ प्रकटन. अजोड अनुभव देऊन सात वाजता सर्वांना रुखरुख लावून कार्यक्रम संपला. विलक्षण परिणामकारक माहोल तयार करून गेलेली जुगलबंदी.
निशांत खॉं यांची सतार कार्यक्रमाचे दुसरे वैशिष्ट्य होते. यमन रागात संगीताची सर्व तपश्चर्या त्यांनी पणाला लावली. सवाईचे व्यासपीठच असे की, कलाकाराला सर्वोत्तम देण्याची स्फूर्ती मिळतेच. पंडित आनिंदो चॅटर्जी तबल्यावर होते पण आलाप, झाला खूपच लांबला. त्यामुळे चॅटर्जींची साथ जेमतेम अर्धाच तास ऐकायला मिळाली. पुण्यातील अनेक प्रस्थापित आणि स्नातक तबलावादकांचे आनिंदो हिरो आहेत. त्या सर्वांची निराशा झाली. त्यातून माईक व्यवस्था गडबडली होती. तबल्याची आस ऐकू येईना, ना डग्ग्याचा घुमारा. आनिंदोच्या फक्त दर्शनाचे समाधान मिळाले.
नऊ वाजता पंडित जसराज गायनाला बसले. त्यांनी निवडलेल्या पूरिया रागातील ‘अबतार’ या बंदिशीने स्मरणरंजनात शिरलो. या बंदिशीची त्यांची लॉंग प्ले रेकॉर्ड १९७५ सालापासून दिनक्रमाचा अविभाज्य भाग झाली होती. पंडितजींचे गायन नेहमीप्रमाणे बहारदार झाले.
पण वारीच्या प्रस्थानाचा मान पटकावला जुगलबंदीनेच!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
‘सवाई’ विशेष: स्वरवारीचे प्रस्थान!
सवाई आता नुसता संगीत महोत्सव राहिला नसून, एक सर्वसमावेशक कलामहोत्सव झाला आहे.
First published on: 13-12-2013 at 01:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawai blog by ravi patki