पुणे : रागसंगीत हा आत्मा असलेला जागतिक कीर्तीप्राप्त सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव अलीकडच्या काळात प्रेक्षकशरण होत चालला आहे का, असा प्रश्न रागसंगीतातील कलाकार आणि रसिकांमधून उमटत आहे. गेल्या काही काळात सातत्याने बॉलिवूडमधील कलाकार महोत्सवात सादरीकरण करत असून, यंदाही संगीतकार-गायक म्हणून प्रसिद्ध असलेले अदनान सामी यांचे पियानोवादन ‘सवाई’च्या मंचावर होणार आहे. कलाकार नामावलीत ‘लोकप्रिय’ नावांचा समावेश करून त्यांच्या ‘सुरांच्या करामती’वर टाळ्या आणि गर्दी खेचण्याची नवी प्रथा पडत असल्याची चिंता जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रागसंगीत केवळ अभिजनांपर्यंत मर्यादित न राहता जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने ‘सवाई’ची वाटचाल झाली. महोत्सवाच्या स्थळांत आणि वेळांत बदल होत गेला, तरी रागसंगीत हाच मुख्य गाभा राहिला. शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य असा तिहेरी संगम यानिमित्ताने पुण्यासह देश-विदेशातून हजेरी लावणारे रसिक अनुभवतात. या महोत्सवात रागसंगीतातील नवोदित आणि बुजुर्गांना ऐकण्याची पर्वणी साधण्यासाठी अनेकजण वर्षभरापासून नियोजन करतात.

हेही वाचा >>>जल, जंगल, जमीन क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज, शरद पवार यांचे मत

गेल्या विशेषत: दीड दशकापासून मात्र रागसंगीतातील कलाकार, जाणकार आणि रसिकांनाही ‘सवाई’चे स्वरूप बदलत असल्याचे जाणवते आहे. प्रेक्षकांना काय आवडेल, याचा विचार करून कलाकारांची निवड होताना दिसते. कमी वेळात कला सादर करण्याचे आव्हान असल्याने रागविस्ताराला तर मर्यादा येतच आहेत, पण उपशास्त्रीय गायन, नाट्यगीत, अभंग, भक्तिगीते अशा प्रकारांत ताना, हरकतींवर भर देऊन किंवा गायक-वादक जुगलबंदी करून टाळ्या मिळवण्याचे प्रकारही वाढत आहेत. ‘प्रयोग करायला, नावीन्य आणायला हरकत नाही, पण मग प्रेक्षकही चमत्कृतीची वाट पाहत बसतात आणि ज्यासाठी महोत्सव सुरू झाला, त्याचा उद्देश मागे पडतो की काय, असे वाटत राहते. ज्या महोत्सवाने श्रोत्यांचा कान तयार केला, त्या महोत्सवाने रसिकांना चुकीच्या ठिकाणी टाळ्या वाजवू देण्याची संधी देऊ नये,’ असे स्पष्ट मत संगीत विश्लेषक सुहास किर्लोस्कर यांनी मांडले. ‘काही वर्षांपूर्वी पं. शिवकुमार शर्मा यांना ‘सवाई’च्याच व्यासपीठावर आलापी सुरू असताना टाळ्या वाजवू नका, असे सांगावे लागले होते,’ अशी आठवणही त्यांनी करून दिली.

‘नवे हवे, म्हणून परंपरा नाकारायची नसते. तशी ती चालू ठेवणारे अनेक नवोदित कलाकार असताना, ‘लोकप्रिय’ कलाकारांच्या मागे लागण्याचा उद्देश समजत नाही. शिवाय, आता तर जोरकस ताना, हरकती घेतल्या म्हणजेच गायक उत्तम, असा समज रसिकांचाही होत असल्याने, तशा करामती करणारे कलाकार दाद मिळवून जाताना दिसतात. विलंबित ख्याल, आलापी हेही रागसंगीतातील सौंदर्य आहे, त्यालाही साधना लागते, याचा विसर पडतो आहे,’ अशी खंत रागसंगीतातील एका जाणत्या कलाकाराने व्यक्त केली.

हेही वाचा >>>हेल्मेटसक्तीची चर्चा

नव्या काळाचा सांगावा?

●पुण्यामध्ये गेल्या दोन दशकांत ‘वसंतोत्सव’, ‘स्वरझंकार’ आदी महोत्सव सुरू झाले. या महोत्सवांचे स्वरूप वेगळे असून, यातील काही महोत्सवांत पाश्चात्त्य संगीतातील प्रसिद्ध नावांपासून सूफी संगीत गाणारे कलाकारही सहभागी होतात.

●अगदी रागसंगीतातील कलाकार बॉलिवूडमधील गाण्यांवर फ्युजन करताना या मंचावर दिसतात. या महोत्सवांच्या ‘स्पर्धे’मुळे किंवा नव्या काळाचा हाच सांगावा आहे, असे म्हणून ‘सवाई’ही बदलत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘सवाई’मध्ये यापूर्वीही हिंदी चित्रपटसृष्टीतील वैजयंतीमाला यांचे नृत्य, येसूदास यांचे गायन, सज्जाद हुसेन यांचे मेंडोलिनवादन झाले आहे. ते इतर क्षेत्रात काम करतात म्हणून इथे त्यांनी सादरीकरण करू नये, असे नाही. अदनान सामी हे पं. शिवकुमार शर्मा यांचे शागीर्द आहेत. त्यांचे वादन उत्तम आहे. उलट अशा क्षेत्रातील कलाकारांना त्यांचे रागसंगीतातील कौशल्य दाखविण्याची संधी आम्ही देतो. अर्थात, ते तितके सक्षम कलाकार असतील, याकडे आम्ही लक्ष देतो. शिवाय, आम्ही रागसंगीतातील जितक्या नवोदित कलाकारांना संधी देतो, तितके इतर कोणीही देत नाही. श्रीनिवास जोशी, कार्याध्यक्ष, आर्य संगीत प्रसारक मंडळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sawai gandharva bhimsen festival being assimilated adnan sami amy