राज्यासह पुण्यात वाढत असलेली करोना बाधित रूग्णांची संख्या आणि राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांमुळे पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावलीमुळे अनिश्चितता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.
यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची इच्छा होती. परंतु, महोत्सवाची भव्यता, व्याप्ती आणि आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने फेब्रुवारीमधील तारखा निश्चित करण्यात आल्याची माहिती याआधी देण्यात आली होती. त्यावेळी राज्य सरकारची जी नियमावली असेल तिचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली होती.
दरवर्षी डिसेंबरमधील दुसऱ्या सप्ताहातील बुधवार ते रविवार हे ५ दिवस संगीतप्रेमी रसिक सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी राखून ठेवतात. मात्र डिसेंबरनंतर महोत्सवाचे आयोजन करण्याची ही तिसरी वेळ आहे. १९६९ मध्ये पानशेत पुरामुळे त्यावर्षी सवाई गंधर्व महोत्सव जाहीररित्या होऊ शकला नव्हता. मात्र नानासाहेब देशपांडे यांच्या घरी हिराबाई बडोदेकर, पं. भीमसेन जोशी, डॉ. वसंतराव देशपांडे आणि पं. फिरोज दस्तूर यांनी गायनाने सवाई गंधर्व यांना अभिवादन केले होते, तर २००९ आणि २०१४ या वर्षी डिसेंबरमध्ये रद्द करण्यात आलेला महोत्सव जानेवारीमध्ये आयोजित केला होता.
हेही वाचा : पुण्यातील डान्सिंग केळीवाला चर्चेत; लॉकडाउनमध्ये नोकरी गेल्यानंतर अनोख्या पद्धतीने झाला ‘आत्मनिर्भर’
करोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षी आयोजन करणे शक्य झाले नाही. या वर्षीही खुल्या मैदानातील कार्यक्रमांसाठी २५ टक्के प्रेक्षकांची अट महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात अडचणीची ठरली होती.