सुगम संगीतातील बारकाव्यांचा अभ्यास केला तर गायकाचे शास्त्रीय गायन सौंदर्यपूर्ण होईल आणि त्याला ‘चार चाँद’ लागतील, असे मत प्रसिद्ध पाश्र्वगायक सुरेश वाडकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले. सुगम संगीतामुळे गाण्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते, हा आपला अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितले.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘अंतरंग’ उपक्रमांतर्गत श्रीनिवास जोशी यांनी सुरेश वाडकर यांच्याशी संवाद साधला. कोल्हापूरचा जन्म, पाश्र्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून घेतलेले गायनाचे आणि सदाशिव पवार यांच्याकडून घेतलेले तबल्याचे प्राथमिक शिक्षण, मुंबई येथे वास्तव्य करताना गुरु जियालाल वसंत यांच्याकडून मिळालेली ‘पतियाळा’ घराण्याची तालीम या आठवणींना उजाळा देत सुरेश वाडकर यांनी ‘चुकचुकली पाल जरी’, ‘धरिला वृथा छंद’ आणि ‘दयाघना’ या गीतांची झलक सादर केली.
गुरुजींकडे शिकताना एक तरी तंत्रवाद्य आलंच पाहिजे हा नियम होता. तंत्रवाद्यामुळे सुरांना धार येते आणि गाणाऱ्याला खूप चांगली मदत होते हीच त्यामागची धारणा होती. त्यामुळे मी सतारवादन शिकलो. एवढेच नव्हे तर, परीक्षाही दिल्या आणि ताल समजण्यासाठी तबलादेखील शिकलो आहे. व्हायोलिनही वाजवू शकतो. शिष्य असा घडावा की तो पुढे गायक झाला नाही तरी त्याला संगीत शिक्षकाची नोकरी मिळू शकेल, असा विचार करणारा गुरु सर्वाना लाभावा, असे सांगून सुरेश वाडकर म्हणाले, ‘मीच गात बसलो तर शिष्य कसे घडणार’ या भूमिकेतून गुरुजींनी स्वत:मधील गायकाला विसरून शिष्यांमध्येच वाहून घेतले.
शास्त्रीय गायकी म्हणजे ‘रोज का कुवा’ आहे. रोज स्वत: खणा आणि पाणी प्या, अशी व्याख्या सांगून सुरेश वाडकर म्हणाले,‘‘आमच्या ‘पतियाळा’ घराण्यामध्ये चमकदार गायकीला महत्त्व आहे. त्यामुळे कलाकार २५ मिनिटांपेक्षा अधिक काळ कोणताही राग गात नाहीत. सुरांची गायकानेच आधी मजा घेतली नाही तर कसे होईल? सुरांना गोंजारलेच नाही तर, बाकीच्या सुरांना केवळ ओरबाडणार का? गुरुजींनी अनेक मैफलींना आम्हा शिष्यांना सोबत नेले आहे. त्यामुळे तालीम तर घेतलीच, पण श्रवणातूनच खूप काही शिकलो. गाण्यापेक्षा ऐकण्याने बुद्धी काम करू शकते.’’
काही संगीतकार त्यांना काय हवे ते सांगतात. पण, संगीतकाराला नेमके काय म्हणायचे आहे हे कित्येकदा आपल्यालाच शोधावे लागते. गाणं ठीकठाक करणे हा गायक म्हणून आपलाही धर्म असला पाहिजे, अशी माझी भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हास्याचे फवारे उडविणारी मैफल
ज्येष्ठ गायक पं. सी. आर. व्यास यांच्या षष्टय़ब्दीपूर्तीनिमित्त झालेल्या सत्कार समारंभात ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले आणि महाराष्टाचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांची हास्याचे फवारे उडविणारी शब्दमैफल रसिकांनी तीन दशकांनंतर नव्याने अनुभवली. ‘षडज्’ अंतर्गत ‘पं. सी. आर. व्यास : राग शुद्ध कल्याण’ हा लघुपट दाखविण्यात आला. मुक्तहस्ताने नव्हे, तर मुक्तकंठाने विद्यादान करणारे गुरु अशा शब्दांत व्यास यांचा गौरव करीत विद्याधर गोखले यांनी ‘संगीत गुणांचा आणि मित्रपरिवाराचा परीघ मोठा असलेला हा व्यास आहे’, अशी भावना व्यक्त केली. ज्यांच्या मनात आणि गळ्यात गानसरस्वतीने मुक्काम केला आहे ते कलाकार कधी वृद्ध होणारच नाहीत. तपश्चर्येला वय नसते. त्यामुळे व्यास साठीचे नाहीत तर सोळा वर्षांचे आहेत. ‘क्लास’ला जाऊन ‘क्लासिकल’ येत नाही. त्यासाठी व्यासांसारखी प्रतिभा असावी लागते, अशी भावना पुलंनी नर्मविनोदी शैलीत व्यक्त केली. प्रसिद्ध संतूरवादक पं. सतीश व्यास आणि गायक पं. सुहास व्यास या वेळी उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा