सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती आणि युवा गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या मैफलीने कानसेन रसिक रविवारी मंत्रमुग्ध झाले. एकाच महोत्सवात पिता आणि कन्येचे गायन होण्याचा दुर्मिळ योग रविवारी साधला गेला आणि गुरू-शिष्या यांच्या गायनाने रसिकांना जणू अनोखी पर्वणी लाभली.
आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित या महोत्सवातील सकाळच्या सत्राची सांगता अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने झाली. तर, सायंकाळच्या सत्राचे कौशिकी चक्रवर्ती यांची मैफल हेच आकर्षण होते. त्यांच्या मैफलीसाठी खुद्द पं. अजय चक्रवर्ती यांच्यासह प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, पं. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी, गायक उपेंद्र भट, आनंद भाटे उपस्थित होते. ‘बिहाग’ रागगायनानंतर त्यांना ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे’ ही ठुमरी गाण्याची फर्माईश झाली. मात्र, पं. अजय चक्रवर्ती यांनी कौशिकी यांना ‘याद पिया की आए’ ही ठुमरी गाण्याचा आग्रह केल्यावर त्यांनी ती नजाकतीने पेश केली.
रागगायनानंतर कौशिकी चक्रवर्ती यांनी २००६ मधील त्यांच्या पहिल्या मैफलीच्या आठवणींना उजाळा दिला. एक दिवस मी घरी असताना दूरध्वनी वाजला. मी तो घेतला. ‘मैं भीमसेन जोशी बोल रहा हूँ. इस साल हमारे यहाँ पूना आना पडेगा’ असा पलीकडून आवाज आला. पंडितजी मला दिसत नसले तरी मी जागेवरच उभी राहिले होते. पं. शिवकुमार शर्मा आणि पं. जसराज यांच्यामध्ये माझे गायन होते. शिवजींचे संतूरवादन झाल्यावर लोक चहा पिण्यासाठी उठून जात होते. माझा कोणताही आक्षेप नाही. त्यांच्याजागी मी असते तर मीदेखील चहा पिण्यासाठी गेले असते. माझे गायन सुरू झाले आणि १५ मिनिटांतच रसिक पुन्हा जागेवर आले. त्यावेळी मला जे प्रोत्साहन मिळाले त्यामुळे पुणे हे आता माझे घरच झाले आहे. पंडितजी गाडीमध्ये बसून माझे गायन ऐकत होते. त्यांच्या आशीर्वादास मी पात्र आहे की नाही हे माहीत नाही. पण, या आशीर्वादानेच मी घडले, अशी भावना कौशिकी चक्रवर्ती यांनी व्यक्त केली.
हे संगीताचे तीर्थस्थान – पं. अजय चक्रवर्ती
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ संगीत महोत्सव नाही तर हे संगीताचे तीर्थस्थान असल्याची भावना ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. पं. भीमसेन जोशी यांनी तीन तपे माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या आशीर्वादामुळे कोलकाता येथे मी १,२०० मुलांना संगीताचे शिक्षण देत आहे. माझी कन्या आणि शिष्या कौशिकी हिला पुणेकरांनी आशीर्वाद दिला. माझे १०-१२ विद्यार्थी आता स्वतंत्र मैफली करू लागले आहेत. त्यामुळे हे स्थान माझ्यासाठी तीर्थस्थानच आहे, असेही पं. चक्रवर्ती यांनी सांगितले.

Story img Loader