पुणे : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वाहन कर्ज सल्लागारानेच बँकेची ४७ कोटी ६५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विद्यापीठ रस्ता आणि टिळक रस्ता शाखेत हा प्रकार घडल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी आदित्य नंदकुमार सेठिया (रा. प्रेमनगर, बिबवेवाडी) याच्यासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बँकेकडून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. बँकेच्या लेखापरीक्षणातून याबाबतची माहिती पुढे आली. बँकेमार्फत मंजूर करण्यात आलेली ४६ वाहन कर्ज प्रकरणे संशयित असल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले होते. वाहन कर्ज करून देणारे आणि बँकेचे वाहन कर्ज सल्लागार (लोन कौन्सिलर) आरोपी आदित्य तसेच साथीदारांनी बँकेची फसवणूक केली. बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून कर्ज मंजूर करून फसवणूक केली. त्याने बँकेतून महागड्या गाड्यांसाठी मोठ्या रकमेचे वाहन कर्ज मंजूर करून घेतले. त्यातील काही प्रकरणात सुरुवातीला इतर खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली. त्यानंतर संबंधित वाहन कर्जदाराच्या नावावर ही रक्कम वर्ग करत बँकेची ४७ कोटी ६५ लाख २६ हजार रुपयांनी फसवणूक केली.
हेही वाचा – यंदा राज्यात सर्वाधिक पीक उसाचे; दुसऱ्या क्रमांकावर केळी, तर तिसऱ्या क्रमांकावर संत्री
आरोपींनी अशा पद्धतीने आणखी काही बँकांची फसवणूक केल्याचा संशय असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर तपास करत आहेत.