भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) अनुसूचित जाती (एससी / एसटी) प्रवर्गाच्या जागा रिक्त राहू नयेत म्हणून या प्रवर्गासाठी पात्रता गुणांची पातळी (कट ऑफ गुण) कमी करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आता अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी गुण पातळी १७७ वरून १२४ करण्यात आली आहे.
आयआयटीतील प्रवेश जेईई अॅडव्हान्स परीक्षेच्या माध्यमातून केले जातात. परीक्षा मंडळाने ३ जूनला कमाल पात्रता गुण जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर प्रवर्ग आणि शाखानिहाय आढावा घेतल्यानंतर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी उपलब्ध असलेल्या जागांपेक्षा कमी विद्यार्थी पात्र ठरत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे परीक्षा मंडळाने पात्रता गुणांची पातळी कमी केली आहे. यापूर्वी या प्रवर्गाताली १७७ (३५ टक्के) पेक्षा जास्त एकूण गुण मिळालेले विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरत होते. मात्र, आता पात्रता पातळी १२४ (२४.५ टक्के) गुणांपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विषयानुसार पात्रता गुणही १० टक्क्य़ांवरून ७ टक्क्य़ांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. या वर्षी देशभरातील आयआयटीची प्रवेश क्षमता १० हजार ६ आहे. त्यातील ७५० जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. बदललेल्या पात्रता गुणांमुळे या प्रवर्गातील अधिक विद्यार्थ्यांना आयआयटीत शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
‘अनुसूचित जातीतील खूप विद्यार्थी आयआयटी अॅडव्हान्स परीक्षेत पात्र ठरले होते. मात्र, देशातील कोणते आयआयटी, विषय, शाखा यांचा ताळमेळ बसत नसल्यामुळे उपलब्ध जागांपेक्षा कमी विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले होते. मात्र, आता पुरेशा प्रमाणात विद्यार्थी मिळतील,’ अशी माहिती परीक्षा मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
आयआयटी अॅडव्हान्स परीक्षेचा अंतिम निकाल २५ जून रोजी जाहीर होणार आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या उत्तरसूचीवर साधारण १५० आक्षेप आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा