शहरातील मोक्याच्या जागांवर बांधण्यात आलेल्या पाच रुग्णालयांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरू आहे. काही विशिष्ट व्यक्ती व संस्थांचा फायदा करून देण्यासाठीच हे खासगीकरण सुरू असून या प्रकारात महापालिकेचे तीस ते बत्तीस कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.
गुलमोहोर कॉलनी येरवडा, नागपूर चाळ येरवडा, बोपोडी, वानवडी आणि कोथरूड या ठिकाणी असलेल्या मोक्याच्या जागांवर महापालिकेने कोटय़वधी रुपये खर्च करून प्रत्येकी ३० ते ५० खाटांची रुग्णालये उभारली आहेत. मात्र, गेली वर्ष-दोन वर्षे तेथे कोणत्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नसल्यामुळे ही रुग्णालये सुरू झालेली नाहीत. या रुग्णालयांचे आता खासगीकरण करण्यात येणार असून त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ही निविदा प्रक्रिया आणि खासगीकरण रद्द करावे, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली आहे.
ही रुग्णालये तीस वर्षांसाठी चालवायला देताना वार्षिक भाडे देता येईल किंवा तीस वर्षांसाठी एकदम प्रीमियम रक्कम भरता येईल अशी सोय करण्यात आली आहे. मात्र, तीस वर्षांचा प्रीमियम भरल्यास ती रक्कम वार्षिक भाडय़ाच्या रकमेपेक्षा ३० ते ३२ कोटी रुपयांनी कमी मिळणार आहे. एवढे मोठे आर्थिक नुकसान सोसून ही रुग्णालये चालवायला देण्याचा खटाटोप का केला जात आहे, अशी विचारणा शिंदे यांनी केली. मुळात, विशिष्ट व्यक्ती व संस्थांना डोळ्यासमोर ठेवूनच निविदेच्या अटी तयार करण्यात आल्या आहेत आणि त्या व्यक्तींनाच हे काम मिळेल अशाप्रकारे प्रयत्न सुरू आहेत, असेही शिंदे म्हणाले.
निविदेच्या अटींमध्ये पुणेकरांना या रुग्णालयांमध्ये रास्त दरात उपचार मिळतील किंवा गरजूंसाठी काही जागा आरक्षित असतील वा त्यांना कमी दरात उपचार मिळतील अशी कोणतीही अट नाही. वास्तविक, पुणेकर केंद्रबिंदू ठेवून ही निविदा काढायला हवी होती. मात्र, खासगीकरणाऐवजी ही रुग्णालये महापालिकेनेच चालवणे आवश्यक असून त्यामुळे महापालिकेचे कोटय़वधींचे नुकसानही वाचणार आहे, असे शिंदे म्हणाले.

Story img Loader