लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : शासकीय तंत्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे संगणक आणि ड्रोन प्रशिक्षण देत अनेक युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आयआयटी, मुंबई येथील शिक्षिका स्वाती देशमुख यांच्या शिक्षण संकल्पनेवर आधारित ‘उत्सव गणेशाचा आदर स्त्री शक्तीचा’ उपक्रमांतर्गत एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने देखावा साकारला आहे. स्वाती देशमुख यांच्याच हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
कर्वे रस्त्यावरील वैद्यराज मामा गोखले चौक येथील एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेल्या बारा वर्षांपासून ‘उत्सव गणेशाचा आदर स्त्री शक्तीचा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित देशातील महिलांनी केलेल्या क्रांतिकारक कार्याचा वेध घेणारा देखावा सादर करत आहे. या वर्षी मंडळाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त आयआयटी, मुंबईच्या स्वाती योगेश देशमुख यांच्या शिक्षण संकल्पनेवर आधारित देखावा साकारला आहे. ऋषिपंचमीचे औचित्य साधून त्यांच्याच हस्ते या देखाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना ड्रोन तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे आणि माजी आमदार मोहन जोशी, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत वेलणकर, चेतन अग्रवाल आणि राजू मगर या वेळी उपस्थित होते.
आणखी वाचा-विसर्जन मिरवणुकीचा खर्च टाळून पूरग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत
व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थी घडवणे हे फार अवघड असून, हे आव्हान मी स्वीकारल्यामुळे मला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. देशाच्या पहिल्या शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्मभूमीत पुणे शहरामध्ये माझा सत्कार होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. -स्वाती देशमुख, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षिका