पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार स्थानिक कला आणि हस्तव्यवसाय अभ्यासक्रमाची निर्मिती, तसेच ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (एससीईआरटी) निधी मंजूर केला आहे. त्यानुसार ‘एससीईआरटी’ला ५ कोटी २७ लाख ८९ हजार रुपये देण्यात येणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. ‘एससीईआरटी’तर्फे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी स्थानिक कला आणि हस्तव्यवसाय अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात वारली पेंटिंग, मातीकाम आणि शिल्पकाम, हस्तव्यवसाय (कागदकाम), बांबूकाम, विणकाम अशा विषयांचा त्यात समावेश आहे. हे अभ्यासक्रम विकसित करून केंद्र सरकारच्या दीक्षा या ॲपवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. यातील प्रत्येक अभ्यासक्रम नऊ ते दहा तासांचा असणार आहे. बेसिक, मीडियम, ॲडव्हान्स्ड अशा तीन स्तरांसाठी प्रत्येकी तीन तासांचा कालावधी असेल. त्यासाठी ७७ लाख ७० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागांतर्गत विविध ‘ई गव्हर्नन्स’चे प्रकल्प राबवण्यात येत असतात. त्या अनुषंगाने ‘एससीईआरटी’सह राज्यभरातील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्यासाठीचे साहित्य खरेदी करण्यासाठी एकूण ४ कोटी ५० लाख १९ हजार रुपये निधी देण्यास मंजुरी देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.