पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील शिक्षकांसाठी वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी १५ ते २५ एप्रिल या कालावधीत नोंदणी करावी लागणार असून, जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी या बाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

१२ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी, तर २४ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना निवडश्रेणी दिली जाते. मात्र, त्यासाठी संबंधित शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे सोपवण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी शिक्षकांचे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालय असे चार गट करण्यात आले आहेत. कला आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांना उच्च माध्यमिक गटाचा पर्याय निवडावा लागणार आहे. प्रशिक्षणासाठीची नोंदणी ऑनलाइन करायची असल्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी एससीईआरटीने संदर्भ साहित्य, चित्रफिती, माहिती उपलब्ध करून दिली आहे. नोंदणी केल्यावर प्रशिक्षणासाठीचे शुल्क भरणे आवश्यक आहे. प्रशिक्षण शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. नोंदणीसाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. नोंदणी केलेल्या शिक्षकांचे गटनिहाय प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. वाचनसाहित्य इंग्रजी, ऊर्दू माध्यमातून उपलब्ध असणार आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.