पुणे : राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च या कालावधीत, तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत होणार आहे.
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. सविस्तर वेळापत्रक http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. वेळापत्रकाबाबत काही हरकती-सूचना असल्यास त्या १५ दिवसांत विभागीय मंडळ, राज्य मंडळाकडे लेखी स्वरुपात सादर करता येतील.
हेही वाचा >>> दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल उद्या, राज्य मंडळाने केली घोषणा
दहावी आणि बारावीच्या परीक्षा प्रचलित पद्धतीनेच होणार आहे. मंडळाच्या वेळापत्रकाची सुविधा ही माहितीसाठीच आहे. परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.