चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या प्रचाराचा खर्च तपासणीचे वेळापत्रक चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने शनिवारी जाहीर केले. त्यानुसार उमेदवारांच्या प्रचाराच्या खर्चाची तीनवेळा तपासणी करण्यात येणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार उमेदवाराने ठेवलेल्या दैनंदिन खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ग-क्षेत्रीय कार्यालय तिसरा मजला, थेरगाव येथे होणार आहे. पहिली तपासणी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच, दुसरी तपासणी २० फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच, तर तिसरी तपासणी २४ फेब्रुवारीला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे, अशी माहिती चिंचवडचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
हेही वाचा- ‘आम्ही दाबणार ‘नोटा’; पुण्याच्या कसब्यातील फलकाची शहरात चर्चा
दरम्यान, चिंचवड पोटनिवडणुकीत २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यामध्ये भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादीचे विठ्ठल (नाना) काटे, शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. या तिघांशिवाय आणखी २५ असे एकूण २८ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. अपक्ष उमेदवारांना शुक्रवारी चिन्हांचे वाटप करण्यात आले आहे.