दहावी किंवा बारावीची परीक्षा झाली की बहुतेक विद्यार्थ्यांना नवीन मोबाईल किंवा दुचाकीचे वेध लागतात. पुण्यातील चार विद्यार्थ्यांनी मात्र आपल्याला मिळालेली पालिकेच्या शिष्यवृत्तीची रक्कम कचरावेचकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊ केली आहे.
कागद- काच- पत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने ही माहिती देण्यात आली. दहावी आणि बारावी उत्तीर्ण होणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी पालिकेतर्फे ‘भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद योजना’ आणि ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे योजने’अंतर्गत अनुक्रमे १५ हजार व २५ हजार रुपयांची बक्षिसे दिली जातात. जून २०१४ मध्ये या शिष्यवृत्ती जाहीर झाल्या. त्याचे पैसे आता विद्यार्थ्यांना मिळाले असून त्यांनी ते कचरावेचकांच्या मुलांसाठी देऊ केले.
संघटनेच्या कार्यकर्त्यां मैत्रेयी शंकर म्हणाल्या, ‘‘पैसे देऊ करणाऱ्यांपैकी एका विद्यार्थिनीची आई शिक्षिका आहे, एकाच्या वडिलांचा स्वत:चा व्यवसाय आहे, तर एका मुलाचे पालक सामाजिक क्षेत्रात काम करतात. पालिकेकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी ८० टक्क्य़ांची अट होती, तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ७० टक्के गुण प्राप्त करण्याची अट होती. काही लोक स्कॉलरशिपसाठी अर्जही करत नाहीत. पण या मुलांनी अर्ज करुन मिळणारे पैसे कचरावेचकांच्या मुलांसाठी देण्याचे ठरवले. शिष्यवृत्तीसाठी आर्थिक उत्पन्नाची अट असावी आणि ज्या विद्यार्थ्यांचे पालक त्यांना खासगी शाळेत, शिकवणीस पाठवू शकतात त्यांच्याऐवजी खऱ्याच गरजू विद्यार्थ्यांना ती मिळावी, अशी इच्छाही त्यांनी प्रदर्शित केली होती. ‘चेंज डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर या विद्यार्थ्यांनी याविषयीची आपली मते मांडली होती आणि त्यांना पाचशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पाठिंबाही दर्शवला.’’   
विद्यार्थ्यांनी दिलेली रक्कम संघटनेच्या सदस्यांच्या मुलांसाठी वह्य़ा खरेदी करण्यासाठी वापरली जाईल, असे संघटनेच्या सहसचिव शैलजा अराळकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘‘पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्व आवश्यक साहित्य पुरवले जात नाही. दप्तर, रेनकोट आणि इतर साहित्यावर पालकांना बराच खर्च करावा लागतो.’’