पुणे : उच्च शिक्षणातील शिष्यवृत्तीच्या थेट लाभ हस्तांतरणासाठी महाडीबीटी संकेतस्थळावर गेल्या तीन वर्षांपासूनचे अर्ज प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या संबंधित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी प्रलंबित अर्जांची तातडीने पडताळणी करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संचालनालयाने दिले असून, प्रलंबित राहिलेल्या अर्जांबाबत प्रश्न उद्भवल्यास संबंधित विद्यापीठांचे कुलसचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे यांनी या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. प्रलंबित अर्जांबाबत कार्यवाही करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासह पुणे, नगर, नाशिक येथील संलग्न महाविद्यालयांना निर्देश देण्यात आले आहेत. शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहिल्याचे महाडीबीटी संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यात महाविद्यालय स्तरावर २०२०-२१मधील ९१, २०२१-२२मधील ११६, २०२२-२३मधील १८४, २०२३-२४मधील ५३९ अर्ज प्रलंबित आहेत. तर, दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांमध्ये २०२०-२१मधील ५०१, २०२१-२२मधील ५०२, २०२२-२३मधील ८५६, २०२३-२४मधील २ हजार २४० अर्ज प्रलंबित असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा…जप्त केलेली कोणत्याही मालमत्ता मुक्त करण्यात आलेली नाही, डीएसके प्रकरणात आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेची न्यायालयास माहिती

u

महाडीबीटी संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांबाबत रोजच्या रोज कार्यवाही करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्जांची महाविद्यालय स्तरावरून पडताळणी करणे गरजेचे आहे. महाडीबीटी संकेतस्थळ, राष्ट्रीय शिष्यवृत्ती संकेतस्थळावरील प्रलंबित अर्जांची पडताळणी झाल्यावर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत महाविद्यालय, विद्यापीठ स्तरावर एकाही विद्यार्थ्याचा अर्ज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.