विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या, शुल्क माफीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही शुल्क आकारणाऱ्या तंत्रनिकेतनांची शासनाने झाडाझडती सुरू केली आहे. अशा महाविद्यालयांची तंत्रशिक्षण विभागाकडून माहिती गोळा करण्यात येत आहे.
शिष्यवृत्ती मिळण्यासाठी पात्र असूनही महाविद्यालयांकडून ती मिळत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत असतात. शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम दिली जात नाही, उत्तीर्ण होऊन महाविद्यालयातून बाहेर पडल्यावरही शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही, शुल्क माफी असतानाही महाविद्यालयाकडून शुल्क आकारले जाते अशा तक्रारी अनेक राज्यातील तंत्रनिकेतन संस्थांबाबत करण्यात आल्या आहेत. यावरून काही महाविद्यालयांवर गुन्हे दाखल होणे, प्राचार्याना अटक होणे असेही प्रकार घडले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर आता या महाविद्यालयांची माहिती गोळा करण्यास तंत्रशिक्षण विभागाने सुरुवात केली आहे. शिष्यवृत्ती वाटपात घोटाळा करणाऱ्या शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतन संस्थांची माहिती विभागाने मागितली आहे. २०१२ ते २०१५ अशा तीन शैक्षणिक वर्षांची माहिती गोळा करण्यात येत आहे.
शिष्यवृत्तीच्या रकमेचे तपशील, संस्थांवर गुन्हे दाखल झाले असल्यास त्याचे तपशील, तपासाची सद्यस्थिती, तपास अधिकाऱ्यांचे अभिप्राय अशी माहिती मागवण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वच संस्थांमध्ये किती विद्यार्थी पात्र आहेत, त्यापैकी किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली, शिष्यवृत्ती मिळाली नसल्यास त्याची कारणे असे तपशीलही विभागीय तंत्रशिक्षण संचालनालयाने सादर करायचे आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा