महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना बसला असून या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही त्यांना गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्तीचे धनादेश मिळू शकलेले नाहीत. सध्या या धनादेशांचे वाटप लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबले आहे.
पुणे शहरात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना दहावी वा बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्यांच्या वर गुण मिळतात, अशा विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. महापालिकेने सन २००७-०८ मध्ये ही योजना सुरू केल्यानंतर सुरुवातीची दोन वर्षे विद्यार्थ्यांना वेळेत धनादेश दिले गेले. जून महिन्यात परीक्षांचे निकाल लागल्यानंतर तीन-चार महिन्यात हे धनादेश दिले जात होते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका या योजनेला आणि पर्यायाने गुणवंत विद्यार्थ्यांनाही बसत आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेचे निकाल जून महिन्यात लागल्यानंतर यंदातर या शिष्यवृत्तीचे धनादेश जानेवारी महिन्यातही तयार झाले नव्हते. त्याबाबत राजकीय पक्षांकडून वेळोवेळी आवाजही उठवण्यात आला. अखेर हे धनादेश तयार होऊन ते प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना देण्याची कार्यवाही सुरू झाली आणि दीड ते दोन हजार धनादेशांचे वाटप झाल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. त्यामुळे पुढील सुमारे आठ हजार धनादेशांचे वाटप थांबवण्यात आले.  
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मे पर्यंत असून महाराष्ट्रातील मतदानाचा अंतिम टप्पा संपल्यानंतर ती शिथिल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास चालू महिन्याच्या अखेरीस पुन्हा धनादेशांचे वाटप सुरू होऊ शकेल. प्रत्यक्षात दहावीतील यशाबद्दल ज्या गुणवंतांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे, त्यांचे अकरावीचे वर्ष संपून आता बारावीचे वर्ष सुरू झाले आहे. तसेच बारावीतील गुणवंतांचेही द्वितीय वर्ष जूनमध्ये सुरू होईल.

Story img Loader