गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात होत असलेला तब्बल आठ-आठ, दहा-दहा महिन्यांचा उशीर लक्षात घेऊन या वर्षीपासून शिष्यवृत्ती देण्याच्या प्रक्रियेत महापालिकेने बदल केला आहे. त्यामुळे यंदा गुणवंतांना विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिष्यवृत्ती मिळेल, अशी शक्यता आहे.
महापालिकेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीला दरवर्षी होत असलेला विलंब चर्चेचा ठरत आहे. शिष्यवृत्ती देण्याच्या या प्रक्रियेला यंदा तब्बल एक वर्ष उशीर झाला आहे. त्यामुळे दहावीचे गुणवंत विद्यार्थी बारावीत गेले, तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही, अशी परिस्थिती यंदा निर्माण झाली. यंदा या प्रक्रियेला प्रथमपासूनच मोठा विलंब झाला आणि पुढे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिष्यवृत्ती वाटपावर र्निबध आले. त्यानंतर जे धनादेश गुणवंतांना दिले गेले ते मुदत संपलेले होते. त्यामुळे पुन्हा ते जमा करून घेणे आणि नवे धनादेश देणे यातही मोठा वेळ गेला. गुणवंत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीत दरवर्षी काही ना काही त्रुटी रहात असल्यामुळे दरवर्षी विलंब होतो. या त्रुटी लक्षात घेऊन यंदापासून प्रक्रियेतच बदल करण्यात येत आहेत.
पुणे महापालिका हद्दीत राहणाऱ्या आणि ऐंशी टक्क्यांवर गुण मिळवणाऱ्या दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पंधरा व पंचवीस हजार रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरुप आहे. अन्य कोणताही निकष या शिष्यवृत्तीसाठी नाही. दहावी व बारावीचे निकाल आता लागले असून शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान यंदा स्वीकारले जातील. त्यातही दोन पद्धती करण्यात आल्या असून १ ते १५ ऑगस्ट दरम्यान हे अर्ज प्रत्यक्ष सादर करता येतील. तसेच त्यानंतर ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल. आलेल्या अर्जाची छाननी करून ती पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम थेट जमा केली जाईल. ही सर्व प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, यासाठी यंदा प्रयत्न केले जाणार आहेत.
महापालिकेची शिष्यवृत्ती
– यंदा सुटसुटीत अर्ज
– अर्ज प्रत्यक्ष सादर करता येईल
– अर्ज ऑनलाईन भरण्याचीही सुविधा
– शिष्यवृत्ती बँक खात्यात जमा होणार
महापालिकेची शिष्यवृत्ती यंदा वेळेत
दहावी व बारावीचे निकाल आता लागले असून शिष्यवृत्तीसाठीचे अर्ज १ ते ३१ ऑगस्ट दरम्यान यंदा स्वीकारले जातील. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे पंधरा व पंचवीस हजार रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरुप आहे. अन्य कोणताही निकष या शिष्यवृत्तीसाठी नाही.
First published on: 27-06-2014 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarship pmc ssc hsc students