लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महाडीबीटी संकेतस्थळावर तंत्रशिक्षण विभागाच्या तीन शिष्यवृत्ती योजनांचे महाविद्यालय स्तरावर १९ हजार ३३ अर्ज प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने सर्व संस्थांना दिले आहेत.
पुणे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. डी. व्ही. जाधव यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख व वसतिगृह निर्वाहभत्ता योजना, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना तंत्रशिक्षण विभागाकडून राबविण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयांत अर्ज करतात.
सर्व कागदपत्रांची पडताळणी करून विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयामार्फत महाडीबीटी संकेतस्थळावर सादर करण्यात येतात. त्यानंतर पुढील प्रक्रिया करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी पात्र वा अपात्र ठरविण्यात येते. मात्र, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेचे ७ हजार ८०१, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाहभत्ता योजनेचे १० हजार ८१०, तर उच्च व्यावसायिक अभ्यासक्रम अल्पसंख्याक योजनेचे ४२२ अर्ज महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर, शिष्यवृत्ती अर्जांबाबत महाडीबीटी संकेतस्थळावरून तातडीने कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसेच, संस्था स्तरावर अर्ज प्रलंबित न ठेवता तातडीने निकाली काढावेत, संस्थेच्या दिरंगाईमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांची राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.