दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देताना महापालिकेकडून गेले वर्षभर जी परवड सुरू आहे, ती अद्याप संपलेली नाही. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश त्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर देण्यात आले आहेत आणि आता हे धनादेश मुदत उलटून गेलेल्या दिनांकाचे असल्यामुळे बँका ते स्वीकारण्यास नकार देत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा हेलपाटे मारावे लागत आहेत.
नगरसेवक दत्ता धनकवडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या तक्रारीचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्तांनाही दिले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेत ऐंशी टक्क्यांवर गुण मिळवणाऱ्या पुणे शहरातील विद्यार्थ्यांना महापालिकेतर्फे पंचवीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. जून २०१३ मध्ये दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर पुढे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया व गुणवंतांचे धनादेश तयार करण्याची प्रक्रिया तीन-चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात धनादेशांचे वाटप फेब्रुवारी महिन्यात सुरू झाले आणि त्यानंतर लगेच आचारसंहिता सुरू झाली. त्यामुळे धनादेशांचे वाटप थांबले.
आचारसंहितेनंतर आता हे धनादेश विद्यार्थ्यांना दिले जात असले, तरी अनेक विद्यार्थ्यांना १७ फेब्रुवारी २०१४ या दिनांकाचे धनादेश दिले जात आहेत. काही विद्यार्थ्यांना त्या दिनांकाच्याही आधीचे धनादेश वाटण्यात आले आहेत. धनादेशाच्या दिनांकापासून तो तीन महिन्यात वटवला गेला पाहिजे असा नियम असल्यामुळे हे धनादेश स्वीकारण्यास बँका नकार देत आहेत, असे धनकवडे यांनी सांगितले. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्ष आता सुरू झाले असले, तरी त्यांना धनादेश मिळालेले नाहीत. त्यात भर म्हणून मुदत संपलेले धनादेश दिले जात आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना मनस्ताप होत असून ज्यांना असे धनादेश देण्यात आले आहेत, त्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करायला सांगितले जात आहे. या प्रकारामुळे पालक त्रस्त झाले आहेत.
मुदत संपलेल्या धनादेशांवरील दिनांक प्रशासनाला आचारसंहितेच्या काळात दुरुस्त करता आले असते. त्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी अधिकाऱ्यांना मिळाला होता. तरीही त्याकडे दुर्लक्ष करून कालबाह्य़ झालेले धनादेश विद्यार्थ्यांना का वाटण्यात आले याची चौकशी करावी, अशीही मागणी धनकवडे यांनी केली आहे.
पालिकेकडून गुणवंत विद्यार्थ्यांना मुदत संपलेल्या धनादेशांचे वाटप
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश त्यांचे शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर देण्यात आले आहेत आणि आता हे धनादेश मुदत उलटून गेलेल्या दिनांकाचे असल्यामुळे बँका ते स्वीकारण्यास नकार देत आहेत.
First published on: 23-05-2014 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Scholarship student pmc cheque