लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे: विज्ञान-संशोधनाच्या क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी पुणे ज्ञान समुहातर्फे (पुणे नॉलेज क्लस्टर) ‘वी ज्ञान’ उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी आणि महिलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राज्यातील अल्प उत्पन्न गटातील आणि उपेक्षित समाजातील पदवीपूर्व स्तरावरील मुलींना तीन महिन्यांसाठी १० हजार रुपये प्रति महिना, पदव्युत्तर स्तरावरील मुलींना पंधरा हजार रुपये प्रति महिना शिष्यवृत्ती दिली जाईल. तर उद्योजक महिलांसाठी साडेसहा लाखांपर्यंत अनुदान आणि सहा महिन्यांसाठी १५ हजार रुपये प्रति महिना या प्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाईल. या शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी २५ जुलै ही अंतिम मुदत आहे.

पुणे ज्ञान समुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रिया नागराज यांनी या बाबत माहिती दिली. पुणे ज्ञान समुहाने बीएएसएफ केमिकल्स या कंपनीबरोबर केलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी गेल्यावर्षी रसायनशास्त्र आणि संबंधित क्षेत्रातील पदवीपूर्व, पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थी आणि उद्योजक महिलांसाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली.

हेही वाचा… पुणे: विद्यार्थ्याला स्टीलच्या छडीने मारहाण; खासगी शिकवणी चालक महिलेविरुद्ध गुन्हा

गेल्यावर्षी आलेल्या २५० अर्जांतून सात पदवीपूर्व विद्यार्थिनी, दहा पदव्युत्तर विद्यार्थिनी आणि उद्योजिका विभागातून चार पीएच.डी. विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थिनी, उद्योजक महिलांना आवश्यक मार्गदर्शन, संस्था-तज्ज्ञांच्या भेटी अशा स्वरुपात मदत केली जाईल, असे डॉ. नागराज यांनी सांगितले.

हेही वाचा… सत्तेत जाण्याआधी आणि सह्या करण्यापूर्वी आम्हाला अजित पवारांनी विश्वासात घेतले- आमदार सुनील शेळके

शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थिनी आणि उद्योजक महिलांना अर्ज करावा लागेल. आलेल्या अर्जांची छाननी करून शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थिनी, उद्योजक महिलांची निवड केली जाईल. शिष्यवृत्तीबाबत अधिक माहिती, पात्रता आदी माहिती https://www.pkc.org.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.