शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के आरक्षित जागांची प्रवेश प्रक्रियेची दुसरी फेरी ५ मे पासून सुरू होणार असून या फेरीत नव्याने नोंद होणाऱ्या १९ शाळांबरोबरच रिक्त जागा असलेल्या शाळांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त एस.चोक्किलगम यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिली. पुढील वर्षीपासून संपूर्ण राज्यभर ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पंचवीस टक्के आरक्षणांतर्गत आतापर्यंत साडेतीन हजारांपेक्षा अधिक प्रवेश झाले आहेत. पहिल्या प्रवेश फेरीमध्ये प्रमाणपत्र, वयाची अट, शाळेपासूनचे अंतर या बाबींमध्ये गोंधळ झाल्यामुळे आता अर्ज भरतानाच सर्व कागपत्रांची तपासणी केली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये त्या एकोणीस शाळांबरोबरच ज्या पालकांना प्रमाणपत्र मिळण्यास उशीर झालेला किंवा काही अडचणी आलेल्या अशा पालकांनाही आता अर्ज करता येणार आहे. तसेच ज्या पालकांना शाळांनी वयाचे किंवा अंतराचे कारण देऊन प्रवेश नाकारले आहेत अशा पालकांनाही पुन्हा दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करता येणार आहे.
‘दुसऱ्या टप्प्यांत प्रत्येकाला प्रवेश खुला असला, तरीही त्याला प्रवेश मिळेलच असे नाही, म्हणूनच पालकांनी आत्ता ज्यांना ज्या शाळा मिळाल्या आहेत, त्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा. प्रवेश न घेतल्यास त्यांचा प्रवेश रद्द ठरविण्यात येईल. प्रवेश नाकारलेल्या पालकांबाबतही निर्णय घेण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांच्या तक्रारींमध्ये तथ्य असेल, तर अशी प्रत्येक तक्रार सोडवण्यात येईल,’ असे चोक्कलिंगम यांनी या वेळी सांगितले.
वय शासनाच्या नियमाप्रमाणेच हवे
ज्या शाळा वयाचे कारण पुढे करून प्रवेश नाकारत आहे अशा सर्व शाळांशी चर्चा करण्यात येईल. त्यामध्ये सीबीएसई, आयसीएसईच्या शाळांचा प्रामुख्याने समावेश आहे. परंतु राज्य शासनाच्या नियमाप्रमाणे जर वय बसत नसेल, तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही असे चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केले.
पालकांची शिक्षण आयुक्तांकडे धाव
गुगल मॅपिंग व रोड मॅपिंग यांच्या अंतरातील फरकाचे कारण सांगून न्यू इंडिया शाळेने प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण आयुक्त आणि प्राथमिक शिक्षण संचालकांची भेट घेतली. शिक्षण मंडळ व जिल्हा परिषद स्तरावर उत्तरे मिळत नसल्याची पालकांची तक्रार आहे. गुगल मॅपिंगने अंतर मोजायचे असे ठरले असले तरी रोड मॅपिंगच्या अंतराचा आग्रह न्यू इंडिया स्कूलकडून का धरला जात आहे असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला. याबाबत शुक्रवापर्यंत अंतिम निर्णय होऊ शकेल, असे प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा