शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी बस कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरील सेवा रस्त्यावर बुधवारी दुपारी उलटली. या अपघातात बमसधील १५ विद्याार्थी जखमी झाले. बस उलटल्यानंतर घाबरलेल्या विद्यार्थ्यांना नागरिकांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने या घटनेत विद्यार्थ्यांना गंभीर स्वरुपाची जखम झाली नाही. बाहयवळण मार्गावरील सेवा रस्त्याची दुर्दशा झाली असून खड्डे तसेच अरुंद रस्त्यावरील खड्यांमुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडत आहेत, अशी तक्रार या भागातील नागरिकांनी केली.
बाह्यवळण मार्गावर आंबेगाव खुर्द परिसरात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे. या शाळेतील तिसरी आणि चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊन बस सेवा रस्त्याने जात होते. सेवा रस्त्यावर असलेल्या तीव्र उतारावर बस चालकाचे नियंत्रण सुटले. त्याचवेळी समोरुन दुचाकीस्वार महिला येत होती. बसचालकाने प्रसंगावधान राखून बस कडेला नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बस उलटली. बस उलटल्यानंतर विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. विद्यार्थ्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी विद्याार्थी वाहतूक करणाऱ्या बसची पाहणी केली. सेवा रस्त्यावरील तीव्र उतारावर बसचे ब्रेक निकामी झाल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना किरकोळ स्वरुपाची इजा झाली आहे. विद्यार्थ्यांना धीर देऊन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीनंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी सांगितले.