स्कूल बसमधून विद्यार्थ्यांचा प्रवास अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने शासनाने काही वर्षांपूर्वी नवी नियमावली आणली असली, तरी शाळा, पालक व प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याने अजूनही या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी होत नसली, तरी वेगवेगळ्या संस्था- संघटनांकडूनही आता स्कूल बसच्या सुरक्षिततेचा विषय गांभीर्याने घेण्यात येत आहे. टाटा मोटर्सच्या वतीनेही देशभरात स्कूल बस चालकांसह विद्यार्थी व पालकांनाही सुरक्षिततेचे धडे देण्यात येत आहेत. सोमवारी पुण्यातही या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
नव्या नियमावलीमध्ये स्कूलबसची रचना व वाहतुकीबाबत अत्यंत काटेकोर नियम करण्यात आले आहेत. स्वत:ची वाहतूक यंत्रणा असणाऱ्या शाळांकडून स्कूल बसच्या रचनेबाबत व नियमांबाबत काही प्रमाणात दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, शालेय वाहतूक अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी चालकांचेही प्रशिक्षण व प्रबोधन होणे गरजेचे आहे. चालकांना हे प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत टाटा मोटर्स कंपनीने सोमवारी पुण्यातील विबग्योर शाळेच्या विविध शाखांतील स्कूल बस चालकांना सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण दिले. या उपक्रमामध्ये दोनशेहून अधिक चालक सहभागी झाले होते.
‘हमारे बस की बात’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात चालकांनी प्रत्यक्षात चर्चात्मक सहभागही घेतला. आपत्कालीन किंवा आणीबाणीच्या प्रसंगी कसे वागावे, त्याचप्रमाणे पालक व विद्यार्थ्यांशी कशा पद्धतीने आपुलकीचे नाते ठेवावे, वैयक्तिक आरोग्य कसे राखावे आदी गोष्टींवर या प्रशिक्षणात भर देण्यात आला. स्कूल बसचे अपघात टाळण्यासाठी काय करायला हवे, याबाबत चालकांसह विद्यार्थी व पालकांनाही माहिती देण्यात आली.
टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहन विभागाचे व्यवसाय प्रमुख संदीप कुमार यांनी या उपक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. लहान मुलांचा प्रवास सुखकर करण्यासाठी देशभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत देशभरातील ४७ शहरांमधील २२४ शाळांच्या दहा हजारांहून अधिक स्कूल बस चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पुढेही हा उपक्रम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा