शाळेच्या बसमधून प्रवास करताना मुले सुरक्षित आहेत का यावर पालकांना सतत लक्ष ठेवता येईल अशी एक तंत्रप्रणाली बाजारात आली आहे. विशेष म्हणजे या तंत्राचा वापर करताना मुलांच्या हाती मोबाइल न देताही पालकांना आपल्या मोबाइलवर मुलांबद्दलची माहिती मिळत राहणार आहे. ‘मार्सुपियाल’ असे या प्रणालीचे नाव असून ती ‘सँडरिव्हर टेक्नॉलॉजी’ या पुण्यातील कंपनीने बनवली आहे. पिरंगुटची इंड्स स्कूल आणि पी. जोग शाळा या दोन शाळांमध्ये जूनपर्यंत या प्रणालीची चाचणी घेऊन त्यानंतर ती इतर शाळांमध्ये राबवण्याचा कंपनीचा विचार आहे.
कंपनीचे संचालक अतुल जोशी यांनी या विषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका शाळेतील लहान मुलीवर शाळेच्या बसमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जोशी म्हणाले, ‘‘शाळेच्या बसमध्ये एक उपकरण बसवण्यात येणार असून प्रत्येक मुलाकडे ‘स्वाइप’ करण्यासाठीची कार्ड्स दिली जातील. पालकांना प्रणालीसाठीचे मोबाइल अॅप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे लागेल. प्रत्येक मुलाच्या कार्डाला एक ‘युनिक’ क्रमांक असेल. त्या मुलाबद्दलची माहिती मिळवण्यासाठी पालक हाच क्रमांक मोबाइल अॅपमध्ये टाकतील. मूल बसमध्ये चढताना आणि उतरताना आपले कार्ड स्वाइप करतील. बस कोणत्या रस्त्याने जात आहे, ती शाळेत कधी पोहोचली, वाहक व चालक कोण आहेत अशी माहिती भरण्यासाठी वाहक आणि चालकाला प्रशिक्षित केले जाणार आहे. पालकांकडे स्मार्टफोन नसेल तर त्यांना एसएमएसवर अलर्ट पाठवले जातील.’’
ही प्रणाली सशुल्क असून त्यासाठी पालकांना प्रतिमहिना १५० ते २०० रुपये शुल्क भरावे लागू शकेल, तर शाळांना बसमध्ये लावण्याचे उपकरण विनामूल्य दिले जाईल, असेही जोशी यांनी सांगितले.
काय माहिती मिळणार?
– मूल बसमध्ये कधी चढले, कधी उतरले
– बस आत्ता कुठे आहे
– बसमध्ये मुले किती आहेत. शेवटच्या स्टॉपपर्यंत एखाद-दोनच मुले उरली असल्यास तसा अलर्ट मिळणार
– मुलाला बसमधून पालकांशी बोलता येणार
– बसमधून शाळेला फोन करता येणार
– बसमध्ये काय चालले आहे याचे व्हिडिओ चित्रीकरण पालकाला पाहता येणार
बसमधील उपकरण बंद पडल्यास काय?
चालक किंवा वाहकाने बसमधील उपकरण बंद केल्यास पुढच्या २ मिनिटांत प्रणालीच्या सव्र्हरवरून शाळेला एक अलर्ट जाईल आणि शाळा त्वरित चालक वा वाहकाशी संपर्क साधू शकतील, असे जोशी यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा