वारजे येथील एका शाळेत शिकणाऱ्या सात वर्षीय विद्यार्थिनीवर स्कूल बस चालकाने बसमध्येच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित स्कूल बस चालकास वारजे पोलिसांनी अटक केली आहे. वानवडी आणि एरंडवणा येथील शाळांमधील स्कूल बस चालकाने अत्याचार केल्याच्या घटना ताज्या असतानाच ही घटना घडली आहे.
संदीप शिवाजी कुंभार (वय ३०, रा. जयहिंद चौक, कामटे वस्ती, शिवणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी वारजे येथील सह्य़ाद्री नॅशनल स्कूलमध्ये शिकण्यास आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना नेण्या-आणण्यासाठी स्कूल बसची व्यवस्था आहे. आरोपी कुंभार याची स्वत:ची स्कूल बस आहे. तोच ही बस चालवितो. ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान कुंभार याने बसमध्ये या मुलीवर अत्याचार केला. बसमधील इतर विद्यार्थी उतरल्यानंतर शाळेसमोर त्याने अत्याचार केला. त्यामुळे मुलीला त्रास होऊ लागला. तिच्या आईने चौकशी केल्यानंतर तिने घटनेविषयी माहिती दिली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. कुंभार याला अटक करून शनिवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
संबंधित स्कूल बस जप्त करायची आहे आणि आरोपीचे काही गुन्ह्य़ात सामील आहेत का, या गोष्टींचा तपास करण्यासाठी कुंभार याला पोलीस कोठडीत ठवण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे हे तपास करीत आहेत.

Story img Loader