शाळांकडूनच वाहतूक नियमांना हरताळ
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील अनेक शाळांच्या रस्त्यावरच उभ्या असणाऱ्या गाडय़ा वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. सध्या शाळांच्या परीक्षा सुरू असल्या आणि सत्र संपण्यासाठी अवघे काही दिवस राहिले असले तरी खरेदीसाठी रस्त्यावरील गर्दीही वाढली आहे. त्यातच सायंकाळी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या शाळांच्या गाडय़ांमुळे अडचणीत भर पडत आहे.
नियमानुसार शाळांनी त्यांच्या गाडय़ा शाळेच्या आवारातच उभ्या करणे आवश्यक आहे. मात्र जुन्या शाळांमध्ये त्यांच्या गाडय़ा उभ्या करण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे रस्त्यावरच या गाडय़ा उभ्या करण्यात येतात. रस्त्यावर उभी असलेली एक गाडी तीन ते चार चारचाकी वाहनांची आणि १० ते १२ दुचाकी वाहनांची जागा अडवते. त्याचप्रमाणे खरेदीसाठी गर्दी होण्याची वेळ आणि शाळा सुटण्याची वेळ एकत्र येत असल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या विद्यार्थी वाहतुकीच्या गाडय़ा अधिकच अडचणीच्या ठरत आहेत.
पुण्यात शहराच्या मध्य भागातील मोठय़ा शाळा पीएमपीच्या गाडय़ा करार करून वापरतात. मात्र शाळेच्या आवारात पीएमपीच्या गाडय़ा उभ्या करण्यासाठी जागा नाही. शहराच्या मध्य भागात रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या या गाडय़ा वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरतात. पिंपरीमधील जयहिंद शाळा डीलक्स चौक या मुख्य चौकापासून हाकेच्या अंतरावर आहे. डीलक्स चौक ते पिंपरी गावाकडे जाणारा रस्ता या शाळेच्या समोरून जातो. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी स्कूल बसचे चालक रस्त्यावर वाहने थांबवून विद्यार्थ्यांची चढ-उतार करतात. त्यामुळे तेथील वाहतूक खोळंबून इतर वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या चौकात वाहतूक पोलीस किंवा वॉर्डनही नेमलेला नाही. याशिवाय मोरवाडी येथील सिटी इंटरनॅशनल स्कूलच्या स्कूल बस तर मुख्य रस्त्याच्या मध्य भागापर्यंत अस्ताव्यस्तपणे उभ्या केल्या जातात. या शाळेत वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे स्कूल बस रस्त्यावरच लावलेल्या असतात. पिंपरीतील इंदिरा गांधी स्कूल ही शाळा शहराच्या मध्यभागी आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी आलेली वाहने रस्त्यावर थांबविली जातात. त्यामुळे तेथील रस्ता स्कूल बस जाईपर्यंत बंद राहतो. काळेवाडी येथील बी. टी. मेमोरियल स्कूलसाठी स्वतंत्र वाहनतळ व्यवस्था असली तरी खासगी वाहने शाळेच्या आवारात नेण्यास बंदी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी किंवा नेण्यासाठी आलेल्या पालकांची वाहने रस्त्यावरच थांबलेली असतात. चुकीच्या पध्दतीने वाहने लावली जात असल्याने वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार वाढले असून यमुनानगर, तळवडे, चिखली, संभाजीनगर, भोसरी, दिघी आदी भागातील शाळांमध्ये होत आहे.
शहरातील प्रत्येक शाळेने ‘स्कूल बस’साठी वाहनतळ निर्माण करणे गरजेचे आहे. अनधिकृतपणे वाहने लावणाऱ्या स्कूल बसवर कारवाई करण्यासाठी लवकरच विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
–अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी
- ‘लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले ?
सर्व गल्ल्या भरलेल्या..
शहराच्या मध्य भागात असलेल्या मुख्य रस्त्यांवर वाहने उभी करण्यासाठी जागाच मिळत नसल्यामुळे या रस्त्यांना लागून असलेल्या गल्यांमध्ये वाहने उभी केली जातात. मुळातच अरुंद असणाऱ्या गल्ल्यांमध्ये स्थानिक रहिवासी, कार्यालये यांची वाहने असतात. त्यातच इतर वाहनांचीही रांग लागते. त्यामुळे या गल्यांमध्येही वाहतूक कोंडी होत आहे. नवी पेठ, शुक्रवार पेठ, अप्पा बळवंत रस्ता, केळकर रस्ता या परिसरातील गल्ल्या, कर्वेनगर, एरंडवणे भागातील गल्यांमध्ये सायंकाळी कोंडी होताना दिसत आहे.
कॅब आणि रिक्षांचीही अडचण
रिक्षा स्टँडवर जागा नाही म्हणून रस्त्यातच रिक्षा उभ्या केलेल्या दिसून येतात. त्यातच आता खासगी कॅब किंवा टॅक्सीची भर पडली आहे. खरेदीला गेलेला ग्राहक परतण्याची वाट पाहात किंवा ग्राहक मिळण्याची वाट पाहात या कॅब रस्त्यातच उभ्या केल्या जातात. वाहनतळाचे शुल्क, एकेरी रस्त्यांमुळे पडणारे वळसे वाचवण्यासाठी कॅबचालकांचे हे उपाय वाहतूक कोंडीच्या समस्येत भर घालत आहेत.
बस स्टॉपवरही वाहने
शहराच्या मुख्य रस्त्यांवर बसस्टॉप समोरही अनधिकृतपणे वाहने उभी केली जातात. त्यातच बसस्टॉपवर रांग हा प्रकारच बहुतेक ठिकाणी नसल्यामुळे स्टॉपच्या समोर उभ्या राहिलेल्या वाहनांच्या समोर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांचे घोळके उभे राहतात. त्यापुढे येऊन बस थांबते. त्यामुळे अगदी एकेरी वाहतूक असणाऱ्या रस्त्यांवरही एखादी बस असेल की त्यामागील वाहतूक खोळंबते.
शिंदे पुलावरही वाहने उभी
बाजारपेठेच्या मध्य भागात वाहने उभी करण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे ओंकारेश्वर मंदिर ते बालगंधर्व रंगमंदिर यांना जोडणारा विठ्ठल रामजी शिंदे पूल बहुतेकवेळा चारचाकी वाहनांनी भरलेला दिसतो. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे या पुलावरही राहिलेल्या जागेत चालणे आणि वाहन चालवणे यासाठी कसरतच करावी.