शिरुर : जीवन विकास मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जगाला भेडसावणाऱ्या कचरा समस्येसंदर्भात जनजागृती करत शून्य कचरा व्यवस्थापनाचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी जगजागृती मोहीम सुरू केली आहे.
जगभरात वाढते तापमान, पर्यावरणाचा असमतोल त्याचबरोबर वाढत्या कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या समस्येची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी व त्याबाबतच्या उपाययोजनांची माहिती व्हावी, या उद्देशाने जीवन विकास मंदिर शाळेतील इयत्ता ५ वी ते ९ वीतील ३५० हून विद्यार्थ्यांनी ‘शून्य कचरा व्यवस्थापन’ या प्रकल्पात सहभाग घेतला. यामध्ये घरगुती प्लॅस्टिक कचरा संकलन, कापडी व कागदी पिशव्या तयार करणे, गटप्रकल्प यावर विद्यार्थ्यानी वेगवेगळे प्रकल्प तयार केले. १०० ते १५० किलो प्लॅस्टिक कचरा संकलन, कापडी व कागदी ७०० हून आधिक पिशव्या तयार केल्या व कचराचे निर्मूलन कसे करावे, याबाबतची माहिती घेतली.
‘माझा कचरा माझी जबाबदारी’ व या कचराचे शास्त्रशुध्द पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे तंत्र या प्रकल्पाद्ववारे विद्यार्थ्यांनी आत्मसात केले.त् याच बरोबर कचरा समस्येसंदर्भात पथनाट्यही सादर केले. या प्रकल्पातून तयार झालेल्या कापडी व कागदी पिशव्याचे प्रदर्शन ही आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचा वेळी कृषिलोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक , लोकजागृती संघटनेचे अध्यक्ष ॲड. ओमप्रकाश सतीजा, शिरुर नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक राहुल पिसाळ , शाळेचे विश्वस्त संजय बारवकर, माजी सभापती ॲड. प्रदीप बारवकर, सिने दिग्दर्शक दीपक घारु , सविता धनक, शिवाजी खरबस, मोहम्मद हुसेन पटेल, मुख्याध्यापक गंगाधर तोडमल, दिलीप शिंदे, निशा कोल्हे, डॉ. वैशाली साखरे , प्राची वाखारे ,स्टेट बॅकेचे सेवानिवृत्त आधिकारी नंदकुमार पिंजरकर आदी उपस्थित होते.
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने शिरूर जीवन विकास मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुका कचरा व ओला कचऱ्याचे विघटन कसे करायचे व प्लॅस्टिक कचरा, ई कचरा व केमिकल कचरा हा पर्यावरणाला किती घातक आहे, हे समजावून देण्याचा उपक्रम राबविला, हे कौतुकास्पद असल्याचे नंदकुमार पिंजरकर म्हणाले .
शून्य कचरा व्यवस्थापन प्रकल्प संकल्पना कृषिलोक विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन विकास मंदिर शाळेतील शिक्षकांनी राबविली. जीवन विकास मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी रामलिंग महाराज यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविली.