नवे सरकार आले आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून अभियाने, जयंत्या, विशेष दिवस असे काही राबवण्याचा सपाटाच लावला आहे. सुट्टय़ा आणि परीक्षा असतानाही सरदार वल्लभभाई पटेल जयंतीला ‘एकता दौड’, संचलन असे उपक्रम आयोजित करण्याच्या हुकूमवजा सूचना मंत्रालयाने शाळा महाविद्यालयांना दिल्या आहेत. मात्र, राज्यातील शाळांच्या दिवाळीच्या सुट्टय़ा अद्याप संपलेल्या नाहीत आणि विद्यापीठांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे हे उपक्रम राबवायचे कसे आणि अहवाल काय पाठवायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
केंद्र शासनाच्या अभियाने राबवण्याच्या हौशीने शाळा, महाविद्यालयांना वेठीस धरले आहे. शाळा, महाविद्यालयांच्या ठरलेल्या वेळापत्रकांचा विचार न करता एखादे अभियान किंवा उपक्रम राबवण्याचा हुकूमच शाळा, महाविद्यालयांना मिळतो. राज्यात गणपतीची सुट्टी असूनही शिक्षक दिनाच्या दिवशी पंतप्रधानांच्या भाषणाचा उपक्रम झाला, त्यानंतर स्वच्छता अभियान झाले आता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला (३१ ऑक्टोबर) शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना याबाबत पत्रे पाठवली आहेत. विद्यापीठाच्या कुलसचिवांनी या एकता दौड आयोजित करण्याच्या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम करावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत ४ नोव्हेंबपर्यंत अहवाल पाठवण्याच्या सूचनाही आयोगाने विद्यापीठांना केल्या आहेत. मात्र, राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये सध्या सत्र परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी करायची की राष्ट्रीय एकतेसाठी धावायचे असा प्रश्न शिक्षकांकडूनच उपस्थित होत आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही शाळांना प्रभात फेरी, एकता दौड, संचलन आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, शाळांच्या दिवाळीच्या सुट्टय़ा अद्यापही संपलेल्या नाहीत. तरीही उपक्रम आयोजित करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. शाळांना हे उपक्रम करणे बंधनकारक नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे शिक्षण आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिले आहे. एकीकडे हे उपक्रम ऐच्छिक असल्याचे सांगायचे आणि त्याचवेळी ते राबवल्याचा अहवालही मागायचा अशा दुटप्पी धोरणाने शिक्षक त्रासले आहे. सुट्टय़ा आणि परीक्षांच्या काळात दिवशी प्रभात फेरी आणि एकता दौडीसाठी मुले शोधायची कुठे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. अभियानाचे अहवाल तयार करण्यातच वेळ जात असल्याची तक्रार शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
‘‘शाळा, महाविद्यालयांचे वर्षांचे वेळापत्रक ठरलेले असते. त्यामुळे अशी अभियाने किंवा उपक्रम राबवायचे असल्यास त्याची सूचना वर्षांचे नियोजन करतानाच मिळायला हवी. गेल्या वर्षीही मौलाना आझाद जन्मशताब्दीच्या सूचना आयत्या वेळी आल्या होत्या. त्यामुळे दिवाळीची सुट्टी एक दिवस कमी करावी लागली होती. आयत्या वेळी येणाऱ्या सूचनांमुळे नियोजन बिघडते आणि उपक्रमही नीट होत नाहीत.’’
– राजेश पंडय़ा, उपाध्यक्ष, टीचर्स डेमॉक्रॅटिक फ्रंट
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा