पुणे : राज्यातील प्रत्येक शैक्षणिक विभागात एक याप्रमाणे एकूण आठ आनंद गुरुकुल (विशेष नैपुण्य) निवासी शाळा स्थापन करण्यात येणार आहे. या शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक विकासासह विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट असून, दोनशे पटसंख्या, नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या या शाळा २०२५-२६पासून सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. नियमित शैक्षणिक अभ्यासक्रमासह २१व्या शतकाची गरज विचारात घेऊन क्रीडा, कला, शास्त्र व तंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, संवाद कौशल्य, वित्तीय सेवा, व्यवस्थापन, आरोग्य सेवा, जागतिक पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास अशा विषयांच्या विशेष नैपुण्य शाखांचा अध्यापन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयांचे उच्च शिक्षण घेण्याची गोडी निर्माण होऊन त्या विषयासाठी देशात उच्च दर्जाचे मनुष्यबळ निर्माण होणार आहे.
आनंद गुरुकुल निवासी शाळांची स्थळनिश्चिती करणे, शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विशेष नैपुण्य विषयांचा अभ्यासक्रम ठरवणे, प्रवेश पद्धती निश्चित करणे, या शाळांची नियमित कार्यपद्धती, दिनदर्शिका ठरवणे या संदर्भातील अभ्यास करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नियुक्त करण्यात आला आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली आहे. तसेच पाच जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या शासकीय विद्यानिकेतन शाळा सुरू आहेत. या व्यतिरिक्त तीन शैक्षणिक विभागात शासकीय विद्यानिकेतनाप्रमाणेच सुविधा उपलब्ध असलेल्या आणि सध्या सुरू असलेल्या शाळांपैकी सुस्थितीत असलेल्या, विकसनासाठी वाव असलेल्या सुयोग्य शाळांची प्रति विभाग एक शाळा याप्रमाणे निवड करावी.
विविध सुविधांच्या सद्य:स्थितीबाबत सविस्तर माहिती घ्यावी. निवास सुविधेसाठी माहिती घेऊन या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने लागणारा आवश्यक निधी विचारात घेऊन शासनाला परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.