पिंपरी- चिंचवड : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पिंपरी- चिंचवड मधील महानगरपालिकेच्या शाळेला सरप्राईज (अचानक) भेट दिली. भुसे यांच्या या भेटीमुळे शाळेतील शिक्षकांची मात्र धांदल बघायला मिळाली. पिंपळे निलख येथील महानगरपालिकेच्या शाळेला भुसे यांनी अचानक भेट दिली. भुसे हे वीस मिनिटांपेक्षा अधिक या शाळेत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील काही प्रश्नही विचारले. यावेळी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी पिंपरी- चिंचवड मधील महानगरपालिकेच्या शाळेला अचानक भेट दिली. या भेटीमुळे शाळेतील शिक्षकांची मात्र धांदल उडाली. दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी देखील मंत्री भुसे यांच्या प्रश्नाला उत्तर दिले.
हेही वाचा…कौटुंबिक वादातून पोटच्या मुलीचा खून करणाऱ्या आईला जन्मठेप
महानगरपालिकेच्या शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलला आहे. यामुळेच की काय शालेय शिक्षण मंत्र्यांनी थेट महानगरपालिकेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी केली. मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्र्यांनी अशाच पद्धतीने सरप्राईज भेट दिल्यास शाळेची गुणवत्ता वाढेलच पण शिक्षकांवर काही प्रमाणात धाक देखील राहील.