नाव काय? हे अक्षर कोणतं? तुला गाणं येतं?.. सध्या अशा प्रश्नांच्या भडिमाराला चिल्ल्यापिल्ल्यांना सामोरे जावे लागत आहे. शिक्षण हक्क कायद्याचा भंग करून शहरातील शाळांमध्ये केजीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांच्या सर्रास मुलाखती घेण्याचे प्रकार सध्या पुण्यात सुरू आहेत.
पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणतीही परीक्षा, मुलाखती न घेता प्रवेश देण्यात यावेत, अशी शिक्षण हक्क कायद्यामध्ये तरतूद आहे. मात्र, सध्या शहरातील शाळा या तरतुदीचा सर्रास भंग करत आहेत. बहुतेक शाळांमध्ये सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. केजी, पहिलीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी मुलाखती घेतल्या जात आहेत. शहरातील नामवंत शाळा अशा प्रकारे शिक्षण हक्क कायद्याचा सर्रास भंग करत आहेत. कायद्यातील तरतुदीनुसार ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ असा निकष ठेवून शाळांनी प्रवेश प्रक्रिया राबवणे आवश्यक आहे. मात्र, शाळांच्या संकेतस्थळांवर प्रवेश प्रक्रियेची माहिती देताना मुलाखती घेण्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. काही शाळा मात्र, कायद्यातील तरतुदीला बगल देण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधत आहेत. ‘मुलाखत’ असा शब्द न वापरता प्रवेश प्रकियेदरम्यान विद्यार्थ्यांचे निरीक्षण करून त्या आधारे प्रवेश देण्यात येणार असल्याचे काही शाळांचे म्हणणे आहे. काही शाळांनी प्रवेश प्रक्रिया त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे भासवून विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मुलाखती, मोठय़ा वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लेखी परीक्षा असे सोपस्कार करत आहेत.
पालकांची अगतिकता
आपल्या मुलाला ‘अमुक’ शाळेतच प्रवेश हवा, असा हट्ट असलेले पालक सध्या या मुलाखतींना तोंड देताना अगतिक झाले आहेत. शाळेच्या प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात माहिती पुस्तकांची विक्री होते आणि त्यामुळे अर्थातच प्रवेशासाठी पालकांचीही गर्दी होते. पन्नास रुपये ते पाचशे रुपये अशी माहिती पुस्तकांची किंमत आहे. मुळातच मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी शाळा मुलाखतींचा मार्ग स्वीकारतात.शाळा कायद्याचा उघडपणे भंग करत असताना, पालकही प्रवेश मिळणार नाही, या धास्तीने तक्रार करण्यास धजावत नाहीत. त्यामुळे शाळाही बेधडकपणे नियमाचा भंग करत आहेत. एखाद्या पालकाने याबाबत शाळेकडे विचारणा केल्यास त्याला ‘तुम्हाला प्रवेश घ्यायचा नसेल, तर घेऊ नका,’ असे उत्तर मिळत आहे.
——
‘‘मुलाखती घेणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, याबाबत बोलण्यासाठी पालक घाबरतात. शाळांकडून घेतली जाणारी मुलाखत म्हणजे डोनेशनबाबत वाटाघाटी असतात. आणि त्याचे पुरावेही पालकांकडे राहात नाहीत. मात्र, ज्या शाळांमध्ये मुलाखतींच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया सुरू असेल त्या पालकांनी पुढे येऊन तक्रार केली पाहिजे.’’
– अजय साठे, अध्यक्ष, महापेरेंट्स असोसिएशन
.
शासनाकडे यंत्रणा नाही आणि
शिक्षण विभागाकडे व्यवस्था नाही
प्रत्येक शाळेच्या प्रवेश प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी किंवा त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शिक्षण विभागाकडे पुरेशी व्यवस्था नाही. त्याचप्रमाणे कुणीतरी तक्रार केल्याशिवाय काहीही कारवाई करणे शक्य नसल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत पुणे विभागाच्या शिक्षण सहसंचालक सुमन शिंदे यांनी सांगितले, ‘‘मुलाखती घेणे हा गुन्हा आहे. पालकांनी पुढे येऊन तक्रार करणे आवश्यक आहे. ज्या पालकांना मुलाखती घेत असल्याचे लक्षात येईल, त्यांनी शिक्षण मंडळ प्रमुख, जिल्हा शिक्षण अधिकारी किंवा विभागीय कार्यालयात तक्रार करावी. तक्रारीची दखल घेऊन शाळांवर योग्य ती कारवाई केली जाईल.’’

Story img Loader