पदवीधर आणि शिक्षक प्रतिनिधींच्या निवडणुकांमुळे राज्याला लागू असलेली आचारसंहिता शिक्षकांच्या पथ्यावर पडली आहे. या आचारसंहितेमुळे शिक्षण विभागाने गाजावाजा केलेला प्रवेशोत्सव या वर्षी साधेपणाने होणार आहे, त्यामुळे राज्यातील शिक्षकांचा जीव भांडय़ात पडला आहे.
शाळेचा पहिला दिवस हा विद्यार्थ्यांची ओळख करून घेण्याचा, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नाते तयार होण्याचा! शिक्षक आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस छान व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्याशी नाते तयार करण्यासाठीही शिक्षकांचा प्रयत्न असतो. मात्र, शिक्षण विभागाने शाळेच्या या पहिल्या दिवसाला उत्सवाचे स्वरूप दिले आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे स्वरूप बदलून गेले. प्रवेशोत्सव साजरा करायचा म्हणून शाळा सजवल्या गेल्या, ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत झाले. स्वागताला खुद्द मंत्र्यांनी, लोकप्रतिनिधींनी हजेरी लावली. एखाद्या जत्रेत हरवून जावीत, तसे नवखे विद्यार्थी या उत्सवात हरवले. शाळेच्या पहिल्या दिवशी बाईंनी सांगितलेली गोष्ट ऐकण्याऐवजी मंत्री महोदयांची कठीण भाषणे ऐकण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली. शाळेतील शिक्षकांचाही पहिला दिवस मंत्र्यांच्या स्वागतात, अधिकाऱ्यांचे हुकूम ऐकण्यात आणि सुरक्षेसाठी आलेल्या पोलिसांच्या गराडय़ात गेला.
 राज्यातील शाळा सोमवारपासून (१६ जून) सुरू होत आहेत. या वर्षी मात्र आचरसंहितेमुळे प्रवेशोत्सवाला मंत्र्यांची हजेरी असणार नाही. त्यामुळे सध्या राज्यातील शिक्षकांचा जीव भांडय़ात पडला आहे. शिक्षक सध्या पूर्वीप्रमाणेच शाळेचा पहिला दिवस अधिकाऱ्यांसाठी नाही, तर मुलांसाठी आठवणीतला व्हावा यासाठी तयारी करत आहेत.