शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात येणारी पुण्यातील पहिल्या निवासी शाळा या शैक्षणिक वर्षांमध्ये सुरू करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, या शाळेसाठी अजूनही जमीन न मिळाल्यामुळे हा प्रकल्प लांबला असल्याचे पुणे जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पुण्यामध्ये शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात येणार होती. या प्रकल्पासाठी २०११ मध्ये राज्य शासनाकडून निधीही मंजूर झाला होता. मात्र, या प्रकल्पासाठी योग्य अशी जागा अजूनही न मिळाल्यामुळे ही शाळा या शैक्षणिक वर्षांमध्येही सुरू होण्याची शक्यता नाही.
शिक्षण हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्यांला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे. मात्र, अजूनही अनेक विद्यार्थी शाळेपासून दूर आहेत. शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांना नियमित शाळेशी जुळवून घेणे जड जाते आणि विद्यार्थी शाळा सोडून देतात. त्यामुळे शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र निवासी शाळा उभी करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य़ विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या परवानगीने या शाळेत प्रवेश देण्याचा प्रस्ताव आहे. या विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा या शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रमही निर्माण करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या वयानुसार त्याला नियमित वर्गात प्रवेश देण्यापूर्वी त्याला काही प्राथमिक गोष्टींचे ज्ञान करून देता येऊ शकेल, अशा पद्धतीने या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे. मात्र, जागा न मिळाल्यामुळे हा प्रकल्प लांबला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा